(मुंबई)
देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची घोषणा करत येत्या ३० जूनपूर्वी सर्व पात्र शेतकऱ्यांची कर्जमाफी पूर्ण करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे आगामी खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना नव्याने पीककर्ज मिळण्याचा मार्ग मोकळा होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
मुंबईत आयोजित राज्यस्तरीय खरीप हंगामपूर्व आढावा बैठकीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री बोलत होते. या बैठकीनंतर नव्या कर्जमाफीची घोषणा होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र, सरकारने आधी घोषित केलेल्या कर्जमाफीची अंमलबजावणी ३० जूनपूर्वी पूर्ण केली जाईल, असे स्पष्ट संकेत मुख्यमंत्र्यांनी दिले.
मुख्यमंत्री म्हणाले, “बहुतांश शेतकरी जूनअखेरीस पीककर्ज घेतात. त्यामुळे ३० जूनपूर्वी कर्जमाफी पूर्ण झाल्यास अधिकाधिक शेतकरी नव्या कर्जासाठी पात्र ठरतील. थकित कर्जदारांची कर्जे माफ करण्यात येणार आहेत.” यावेळी त्यांनी बँकांनाही महत्त्वाच्या सूचना दिल्या. सरकारकडून अंतिम यादी मंजूर झाल्यानंतर निधी जमा होण्यास काही विलंब झाला तरी पात्र शेतकऱ्यांना पीककर्ज देण्याचे निर्देश देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. “सरकारचे पैसे बँकांना मिळणारच आहेत. विलंब झाल्यास त्यावरील व्याजही दिले जाईल,” असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले.
‘सिबिल स्कोअर’ची सक्ती करू नका; बँकांना सरकारचे निर्देश
राज्यातील शेतकऱ्यांना अधिक प्रमाणात कृषी कर्ज उपलब्ध व्हावे यासाठी सरकारने नियोजन केल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. जिल्हा सहकारी आणि ग्रामीण बँकांकडून सुमारे ६७ टक्के कृषी कर्जवाटप केले जाते, तर राष्ट्रीयीकृत बँकांचा वाटा २६ टक्के आहे. मात्र, राष्ट्रीयीकृत बँकांकडून कृषी कर्जवाटपाचे उद्दिष्ट पूर्ण होत नसल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. शेतकऱ्यांना कर्ज देताना ‘सिबिल स्कोअर’ची सक्ती करू नये किंवा अन्य अडचणी निर्माण करू नयेत, असे स्पष्ट निर्देश सर्व बँकांना देण्यात आल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
राज्यात सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज
यंदा ‘एल निनो’च्या प्रभावामुळे राज्यात सरासरीच्या केवळ ८८ टक्के पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. त्यामुळे पिकांवर ताण वाढू शकतो, असे सांगत हवामानानुसार कृषी नियोजन सुरू असल्याचे फडणवीस यांनी स्पष्ट केले. तसेच जलयुक्त शिवार योजनेच्या कामांनाही गती देण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.
शेतकऱ्यांसाठी ‘महाविस्तार’ AI अॅप सुरू
शेतीविषयक मार्गदर्शनासाठी राज्य सरकारने ‘महाविस्तार’ हे नवीन एआय-आधारित अॅप सुरू केले आहे. या अॅपच्या माध्यमातून पीकपद्धती, हवामान, रोगनियंत्रण आणि शेतीविषयक सल्ला शेतकऱ्यांना थेट मिळणार आहे. शेतकरी स्वतःचे प्रश्न विचारून त्वरित माहिती मिळवू शकतील, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
खत टंचाई टाळण्यासाठी सरकार सतर्क
जागतिक परिस्थितीमुळे यंदा खत उत्पादनावर ताण येण्याची शक्यता असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. कृषी क्षेत्रासाठी असलेली खतं औद्योगिक वापरासाठी वळवली जात नाहीत ना, यावर सरकार विशेष लक्ष ठेवणार असून व्हिडिओग्राफीद्वारे निरीक्षण केले जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

