(संगमेश्वर / एजाज पटेल)
संगमेश्वर तालुक्यातील आंबेड बुद्रुक येथे मुसळधार पावसामुळे ओढ्याला आलेल्या प्रचंड प्रवाहात वाहून गेल्याने ३९ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. गणेश गंगाराम शिवगण (वय ३९, रा. शिगवणवाडी, आंबेड बुद्रुक, ता. संगमेश्वर, जि. रत्नागिरी) असे मृत तरुणाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गणेश शिवगण हा आंबेड बुद्रुक येथे एकटाच राहत होता. तो नेहमी शिगवणवाडी येथील ओढ्यातून घरी ये-जा करत असे. सोमवार, ६ जुलै रोजी सायंकाळी साडेसात ते मंगळवार, ७ जुलै रोजी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या दरम्यान झालेल्या मुसळधार पावसामुळे ओढ्याला मोठा पूर आला होता. या पाण्याच्या प्रचंड प्रवाहात तो वाहून गेला.
त्यानंतर आंबेड बुद्रुक ते सोनगिरी मार्गावरील चिनामिना पुलाखालील मोरीतून वाहणाऱ्या पाण्यात त्याचा मृतदेह आढळून आला. घटनेची माहिती मिळताच परिसरात एकच खळबळ उडाली.
मानसकोंड गावचे पोलीस पाटील तथा आंबेड बुद्रुक गावाचा अतिरिक्त कार्यभार सांभाळणारे विकास गोविंद फेफडे यांनी या घटनेची खबर संगमेश्वर पोलीस ठाण्यात दिली. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल व्ही. व्ही. मनवल हे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली करत आहेत. शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार असून, या दुर्दैवी घटनेमुळे आंबेड बुद्रुक परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

