(लातूर)
देशभरात गाजलेल्या NEET परीक्षेच्या कथित पेपरफुटी प्रकरणाचा तपास आता निर्णायक टप्प्यावर पोहोचला असून केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) महाराष्ट्रात मोठी कारवाई केली आहे. लातूरमधील प्रसिद्ध RCC (रेणुकाई केमिस्ट्री क्लासेस) चे संचालक शिवराज मोटेगावकर यांना सीबीआयने प्रदीर्घ चौकशीनंतर ताब्यात घेतल्याने राज्यातील शैक्षणिक क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.
NEET पेपरफुटी प्रकरणातील तपास दिवसेंदिवस अधिक घेत असून RCC (रेणुकाई कोचिंग क्लासेस) चे संचालक शिवराज मोटेगावकर यांना न्यायालयात हजर केल्यानंतर ९ दिवसांची सीबीआय कोठडी सुनावण्यात आली आहे. या कारवाईनंतर लातूरमधील ट्युशन आणि कोचिंग क्षेत्रात मोठी खळबळ उडाली असून शहरात पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सीबीआयचे २८ सदस्यीय पथक गेल्या काही दिवसांपासून लातूरमध्ये तळ ठोकून तपास करत आहे. शुक्रवारी मोटेगावकर यांच्या निवासस्थानी तब्बल नऊ तास चौकशी करण्यात आली होती. त्यानंतर रविवारी त्यांना पुण्यात बोलावून पुन्हा ११ तास मॅरेथॉन चौकशी करण्यात आली. अखेर आज (सोमवारी, १८ मे) रोजी सीबीआयने त्यांना ताब्यात घेतले.
दरम्यान, सीबीआयच्या पथकाने RCC क्लासेसच्या कार्यालयावर छापे टाकत संगणक, लॅपटॉप आणि इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणांची तपासणी केली. तपास यंत्रणेकडून डिजिटल पुरावे गोळा करण्यात येत असल्याची माहिती समोर आली आहे.
या प्रकरणात एका पालकाने तक्रार दाखल करत गंभीर आरोप केले होते. RCC क्लासेसने घेतलेल्या ‘मॉक टेस्ट’मधील तब्बल ४२ प्रश्न मुख्य NEET परीक्षेत जशास तसे आल्याचा दावा करण्यात आला होता. याशिवाय सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमध्ये मोटेगावकर विद्यार्थ्यांना “आपल्या सराव परीक्षेतील किती प्रश्न मुख्य परीक्षेत आले?” असा सवाल करताना दिसत होते. यानंतर सीबीआयने या प्रकरणाचा तपास अधिक गतीने सुरू केला.
याआधी NEET प्रश्नपत्रिका तयार करणाऱ्या समितीशी संबंधित असल्याचा संशय असलेल्या लातूरमधील निवृत्त प्राध्यापक पी. व्ही. कुलकर्णी यांनाही सीबीआयने ताब्यात घेतले होते. मोटेगावकर आणि कुलकर्णी यांच्यातील संबंध तसेच संभाव्य रॅकेटचे धागेदोरे तपासण्यावर आता भर दिला जात आहे.
सीबीआयचे पथक गेल्या काही दिवसांपासून लातूरमध्ये विविध ठिकाणी छापेमारी करत असून महत्त्वाची कागदपत्रे, विद्यार्थ्यांच्या नोंदी तसेच डिजिटल पुरावे जप्त करण्यात आले आहेत. विशेषतः सेवानिवृत्त प्राध्यापक पी. व्ही. कुलकर्णी यांना ताब्यात घेतल्यानंतर तपासाला अधिक वेग आला असल्याचे मानले जात आहे.
शुक्रवारी पहाटेपासून सीबीआयचे अधिकारी मोटेगावकर यांच्या सुतमील परिसरातील निवासस्थानी दाखल झाले होते. घरातील दस्तऐवज, विद्यार्थ्यांशी संबंधित नोंदी, संगणक, मोबाईल आणि इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणांची सखोल तपासणी करण्यात आली. त्यानंतर उद्योग भवन परिसरातील RCCच्या मुख्य कार्यालयातही छापेमारी करून विविध माहिती आणि डिजिटल डेटा गोळा करण्यात आला.
दरम्यान, सीबीआयचे पथक आजही RCC कार्यालयात तपास करत असल्याची माहिती समोर आली आहे. या संपूर्ण कारवाईबाबत प्रचंड गोपनीयता पाळण्यात येत असून लातूर पोलिसांच्या मदतीने तपास सुरू आहे. तपासादरम्यान काही महत्त्वाचे धागेदोरे हाती लागल्याची चर्चा असली, तरी अधिकृतरीत्या कोणतीही माहिती जाहीर करण्यात आलेली नाही.
लातूरमध्ये विविध कोचिंग क्लासेसबाहेर पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला असून RCC क्लासेस परिसरातही सुरक्षा वाढवण्यात आली आहे. NEET पेपरफुटी प्रकरणातील लातूर कनेक्शन समोर आल्यानंतर सीबीआयने तपासाची व्याप्ती वाढवली असून पुढील काही दिवसांत आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, RCC क्लासेसच्या मागील आर्थिक व्यवहारांचीही आता चौकशी सुरू होण्याची चिन्हे आहेत. जवळपास १०० कोटी रुपयांच्या वार्षिक उलाढालीपर्यंत पोहोचलेल्या या कोचिंग नेटवर्कवर आता अंमलबजावणी संचालनालयाची (ED) नजर गेल्याची चर्चा आहे.
मोटेगावकर यांनी सुरुवातीला उमरगा आणि लातूर येथील महाविद्यालयांमध्ये तासिका तत्त्वावर रसायनशास्त्र विषयाचे अध्यापन सुरू केले होते. केमिस्ट्री विषयातील प्रभुत्व आणि वेगळी अध्यापनशैली यामुळे त्यांची ओळख निर्माण झाली. त्यानंतर ‘रेणुकाई कोचिंग क्लासेस’च्या माध्यमातून त्यांनी खासगी शिकवणी क्षेत्रात पाऊल टाकले. सुरुवातीला केवळ केमिस्ट्री विषयापुरता मर्यादित असलेला क्लास पुढे “सर्व विषय एकाच छताखाली” या संकल्पनेतून विस्तारत गेला. नामांकित शिक्षकांना जोडत RCCने राज्यभरात आपले जाळे निर्माण केले.
आता NEET पेपरफुटी प्रकरणात RCCचे नाव समोर आल्यानंतर केवळ शैक्षणिकच नव्हे, तर आर्थिक व्यवहारांचाही तपास होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
दरम्यान, या कारवाईचे पडसाद शेजारच्या नांदेड जिल्ह्यातही उमटले आहेत. सीबीआयच्या धास्तीने अनेक मोठ्या खासगी कोचिंग क्लासेसनी अचानक सुट्ट्या जाहीर केल्याची चर्चा सुरू आहे.
३ मे रोजी झालेल्या NEET परीक्षेतील कथित गैरप्रकार उघड झाल्यानंतर केंद्र सरकारने परीक्षा रद्द करत संपूर्ण तपास सीबीआयकडे सोपवला होता. आता RCC क्लासेसच्या संचालकांवर झालेल्या कारवाईनंतर या घोटाळ्याचे धागेदोरे आणखी कुठपर्यंत पोहोचतात, याकडे देशभराचे लक्ष लागले आहे.

