(संगमेश्वर / एजाज पटेल)
संगमेश्वर तालुक्यातील मेढे तर्फे फुणगूस गावातील शेतकऱ्यांच्या शेतीचे मुसळधार पावसामुळे मोठे नुकसान झाले असून, या संदर्भातील वृत्त प्रसिद्ध होताच अखेर प्रशासनाला जाग आली आहे. बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर अवघ्या २४ तासांत कृषी आणि महसूल विभागाचे अधिकारी गावात दाखल झाले असून बाधित क्षेत्राचे पंचनामे युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहेत.
अलीकडील मुसळधार पावसामुळे स्थानिक नदीने आपला नैसर्गिक प्रवाह बदलत थेट पिकाऊ शेतांमधून वाहण्यास सुरुवात केली. त्यामुळे अनेक एकर सुपीक जमीन वाहून गेली, पिकांचे मोठे नुकसान झाले आणि अनेक शेतजमिनी नदीपात्रात विलीन झाल्या. या गंभीर परिस्थितीनंतरही अनेक दिवस प्रशासनाकडून पंचनामे न झाल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले होते.
लोकप्रतिनिधींनी नुकसानीची पाहणी केली होती. मात्र, महसूल आणि कृषी विभागाकडून कोणतीही ठोस कार्यवाही होत नसल्याने शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत होता. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांची व्यथा आणि प्रशासनाची उदासीनता माध्यमांद्वारे समोर आल्यानंतर वरिष्ठ पातळीवरून तातडीने हालचाली सुरू झाल्या.
यानंतर कृषी सहाय्यक, तलाठी आणि महसूल विभागाचे अधिकारी प्रत्यक्ष बाधित शेतांमध्ये पोहोचले. चिखलातून पायपीट करत त्यांनी नदीचा बदललेला प्रवाह, जमिनीची झालेली धूप, वाहून गेलेली पिके आणि बाधित शेतीची प्रत्यक्ष पाहणी केली. नुकसानग्रस्त क्षेत्राचे अचूक पंचनामे करून अहवाल तयार करण्याचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे.
अनेक दिवस मदतीच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना या कारवाईमुळे दिलासा मिळाला आहे. माध्यमांनी आमच्या समस्येला योग्य वाचा फोडल्यामुळेच प्रशासन आमच्या बांधावर पोहोचले, अशा भावना अनेक शेतकऱ्यांनी व्यक्त केल्या.
मात्र, ग्रामस्थांनी केवळ पंचनामे आणि होणाऱ्या आर्थिक मदतीवर समाधान व्यक्त केलेले नाही. नदीने बदललेला प्रवाह भविष्यातही शेतीसाठी मोठा धोका ठरू शकतो. त्यामुळे नदीचा प्रवाह पुन्हा मूळ पात्रात वळविणे, संरक्षण भिंती उभारणे आणि कायमस्वरूपी पूरप्रतिबंधक उपाययोजना राबविणे आवश्यक असल्याची मागणी ग्रामस्थांनी प्रशासनाकडे केली आहे.
आता पंचनाम्यांचा अहवाल तातडीने वरिष्ठांकडे सादर होऊन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासकीय मदत किती लवकर मिळते, याकडे मेढे गावासह परिसरातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

