(देहरादून/गाझियाबाद)
बाबा केदारनाथचे दर्शन घेऊन नव्या आयुष्याची स्वप्नं डोळ्यांत साठवत परतणाऱ्या एका नवविवाहित जोडप्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. देहरादूनहून गाझियाबादकडे येणाऱ्या ट्रेनमधून 29 वर्षीय प्रज्ञा सिंह रहस्यमयरीत्या बेपत्ता झाली असून गेल्या सहा दिवस उलटूनही तिचा कोणताही ठावठिकाणा लागलेला नाही. या घटनेमुळे रेल्वे सुरक्षा व्यवस्था आणि पोलीस तपास यंत्रणांवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
मूळचे कानपूरचे असलेले मनीष अग्रहरी आणि प्रज्ञा सिंह यांनी याच वर्षी फेब्रुवारी महिन्यात प्रेमविवाह केला होता. मनीष ग्रेटर नोएडातील एका कॉर्पोरेट कंपनीत कार्यरत आहे. लग्नानंतर प्रथमच हे जोडपे केदारनाथ दर्शनासाठी गेले होते. 5 मे रोजी दर्शन आटोपून दोघे देहरादूनहून गाझियाबादकडे ट्रेनने परतत होते.
पतीचा डोळा लागला अन् पत्नी अचानक गायब
मनीषने दिलेल्या माहितीनुसार, हरिद्वारपर्यंत दोघांमध्ये सर्व काही सुरळीत होते. प्रवासाच्या थकव्यामुळे त्याचा डोळा लागला. मात्र ट्रेन मुजफ्फरनगरच्या दिशेने जात असताना जाग आल्यावर प्रज्ञा सीटवर नसल्याचे त्याच्या लक्षात आले. सुरुवातीला ती वॉशरूममध्ये गेली असेल असे त्याला वाटले. मात्र बराच वेळ होऊनही ती परत न आल्याने त्याची घालमेल वाढली. त्यानंतर संपूर्ण ट्रेनमध्ये शोध घेऊनही प्रज्ञाचा काहीच मागमूस लागला नाही.
रेल्वे ट्रॅकजवळ मोबाईलचे शेवटचे लोकेशन
प्रज्ञाच्या शोधादरम्यान एका प्रवाशाने पोलिसांना सांगितले की, रुडकी स्टेशननंतर त्यांनी प्रज्ञाला कोचच्या केबिनबाहेर जाताना पाहिले होते. तपासात सर्वात धक्कादायक बाब म्हणजे प्रज्ञाच्या मोबाईलचे शेवटचे लोकेशन उत्तराखंडमधील लक्सर येथे रेल्वे ट्रॅकजवळ आढळले. त्यानंतर तिचा मोबाईल सतत स्विच ऑफ येत आहे. प्रज्ञाकडे ना पैसे होते, ना दुसरे कोणते प्रवासाचे साधन. त्यामुळे कुटुंबीयांनी घातपाताची शक्यता व्यक्त केली आहे.
CCTV बंद; तपासात मोठा अडथळा
या प्रकरणाचा तपास करताना पोलिसांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. रुडकी आणि मुजफ्फरनगर या दोन्ही महत्त्वाच्या रेल्वे स्थानकांवरील सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे प्रज्ञा ट्रेनमधून नेमकी कुठे उतरली किंवा तिला भूल देऊन कोणी खाली उतरवले का, याचा कोणताही ठोस पुरावा पोलिसांच्या हाती लागलेला नाही. रेल्वे ट्रॅक, पूल आणि आसपासच्या परिसरात शोधमोहीम राबवण्यात आली. मात्र, अद्याप कोणतेही संशयास्पद पुरावे सापडलेले नाहीत.
‘कट’ की अपघात की पलायन? पोलीसही संभ्रमात
पोलिसांनी प्रज्ञाचे कॉल डिटेल्स, व्हॉट्सॲप चॅट्स आणि मोबाईल मेसेजेस तपासले आहेत. मात्र, त्यात कोणतेही संशयास्पद संभाषण किंवा नंबर आढळून आलेले नाहीत. पती-पत्नीमध्ये कोणतेही वाद झाले नसल्याचेही तपासात स्पष्ट झाले आहे. तांत्रिक पुरावे, सीसीटीव्ही फुटेज आणि प्रत्यक्ष साक्षीदारांचा अभाव यामुळे ही बेपत्ता होण्याची घटना पोलिसांसाठी मोठे कोडे बनली आहे.
“माझं जगच उद्ध्वस्त झालं…”
पत्नीच्या अचानक बेपत्ता होण्याने पती मनीष पूर्णपणे खचला आहे. “माझं जगच उद्ध्वस्त झालं आहे. प्रज्ञा कुठे असेल, कोणत्या परिस्थितीत असेल, या विचाराने अंगावर काटा येतो,” अशा शब्दांत त्याने आपली व्यथा व्यक्त केली. मनीष आणि प्रज्ञाच्या कुटुंबीयांनी उत्तराखंड आणि उत्तर प्रदेश सरकारकडे मदतीची याचना केली असून प्रज्ञाचा लवकरात लवकर शोध घेण्याची मागणी केली आहे. या महिलेची माहिती असल्यास संपर्क करण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

