(खेड/ मुंबई)
खेड तालुक्यातील निसर्गरम्य रघुवीर घाटाच्या सर्वांगीण विकासासाठी विशेष निधी मंजूर करण्यात यावा, अशी मागणी आमदार प्रमोद जठार यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची भेट घेऊन केली. यासंदर्भातील सविस्तर निवेदन त्यांनी मंत्र्यांना सादर केले.
निवेदनात रघुवीर घाट हा वाहतुकीच्या तसेच पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वाचा मार्ग असल्याचे नमूद करण्यात आले आहे. घाटामध्ये वाढत्या वाहतुकीच्या पार्श्वभूमीवर रस्त्याचे रुंदीकरण, आवश्यक ठिकाणी काँक्रीटीकरण, संरक्षक भिंती (रिटेनिंग वॉल), सुरक्षित कठडे तसेच दरडी आणि अपघातांचा धोका लक्षात घेऊन सुरक्षाविषयक उपाययोजना तातडीने राबविण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
याशिवाय रघुवीर घाटाचे पर्यटनस्थळ म्हणूनही नियोजनबद्ध पद्धतीने विकसित करण्याची मागणी करण्यात आली आहे. त्यासाठी आकर्षक व्ह्यू पॉइंट, वाहनांसाठी पार्किंगची सुविधा, स्वच्छतागृहे, पर्यटकांसाठी मूलभूत सुविधा, सुशोभीकरण आणि आवश्यक पायाभूत विकासकामे हाती घेण्यासाठी विशेष निधी उपलब्ध करून देण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली.
या मागणीची सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सकारात्मक दखल घेत संबंधित विभागाकडून प्रस्तावाची सविस्तर पडताळणी करून आवश्यक कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन आमदार प्रमोद जठार यांना दिले.
रघुवीर घाटाचा सर्वांगीण विकास झाल्यास या मार्गावरील वाहतूक अधिक सुरक्षित होण्याबरोबरच परिसरातील पर्यटनाला चालना मिळेल आणि स्थानिकांच्या आर्थिक विकासालाही मोठा हातभार लागेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

