(ठाणे)
ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगर शहर पुन्हा एकदा गोळीबाराच्या घटनेने हादरले आहे. नेहमी गर्दीने गजबजलेल्या कैलासनगर परिसरात भररस्त्यात झालेल्या बेछूट गोळीबारात दोन सख्ख्या भावांचा मृत्यू झाला असून २ ते ३ जण जखमी झाले आहेत. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, उल्हासनगरच्या कैलास कॉलनी परिसरात गुरुवारी सायंकाळी सुमारे ८ वाजण्याच्या सुमारास ही थरारक घटना घडली. अनिल चौहान आणि अमन चौहान या दोन्ही भावांवर अज्ञात हल्लेखोरांनी जवळून गोळ्या झाडल्या. ८ ते १० जणांच्या टोळीने गर्दीच्या ठिकाणी केलेल्या या हल्ल्यात दोन सख्ख्या भावांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला, तर त्यांचे काका गंभीर जखमी झाले असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. जखमींना तातडीने मध्यवर्ती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मृत अनिल चौहान आणि अमन चौहान हे टेम्पो चालक असल्याची माहिती समोर आली आहे. घटनेच्या वेळी दोघेही कैलासनगर परिसरात उभे असताना १० ते १५ जणांच्या टोळीने त्यांच्यावर अचानक हल्ला चढवला. हल्लेखोरांनी सातपेक्षा अधिक राऊंड फायर केल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.
मृत अमन चौहानच्या भावाने गंभीर आरोप करत सांगितले की, “बलवीन केदार, श्रीकांत केदार, अजय लाल, अजेत शेख, देवेंद्र नाईक आणि सागर पाटील या टोळीने आमच्याकडे हफ्त्याची मागणी केली होती. टेम्पो चालवायचा असेल तर पैसे द्यावे लागतील, अन्यथा जीवे मारू अशी धमकी दिली होती. याबाबत आम्ही पोलिसांत तक्रारही केली होती. मात्र त्यानंतरही टोळीने हल्ला करून माझ्या भावांची हत्या केली.”
या प्रकरणामागे जुन्या वादाची पार्श्वभूमी असल्याची माहिती समोर येत आहे. २०२० पासून दोन्ही गटांमध्ये वाद सुरू होता. याआधीही हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल झाल्याचे समजते.
घटनेनंतर परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. गोळीबारानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाले असून त्यांच्या शोधासाठी पोलिसांची चार विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत. आरोपींची ओळख पटली असल्याची माहिती पोलीस उपआयुक्त सचिन गोरे यांनी दिली.
अत्यंत वर्दळीच्या परिसरात झालेल्या या दुहेरी हत्येमुळे उल्हासनगर शहरात भीती आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

