(मुंबई)
मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ आणि बहुप्रतिभावान अभिनेते अच्युत पोतदार यांचे वयाच्या 91 व्या वर्षी दुःखद निधन झाले. काल, सोमवार 18 ऑगस्ट 2025 रोजी रात्री त्यांनी ठाणेतील ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये अखेरचा श्वास घेतला. मिळालेल्या माहितीनुसार, मागील काही दिवसांपासून ते आजारी होते आणि रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र, त्यांच्या निधनाचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
अच्युत पोतदार यांच्या निधनाने संपूर्ण चित्रपट व रंगभूमी विश्वात शोककळा पसरली आहे. त्यांच्या अभिनयातील सच्चेपणा, नम्र व्यक्तिमत्त्व आणि विविधांगी भूमिकांमुळे ते प्रेक्षकांच्या मनात कायमचे घर करून गेले होते. त्यांच्यावर अंतिम संस्कार आज मंगळवार, 19 ऑगस्ट रोजी ठाण्यात होणार आहेत.
अभिनयाच्या आधी सैन्यात सेवा
अभिनय क्षेत्रात येण्याआधी अच्युत पोतदार यांनी भारतीय सैन्यात सेवा बजावली होती. त्यानंतर त्यांनी जाहिरात क्षेत्रातही काही काळ काम केलं. 80 च्या दशकात त्यांनी अभिनयाची वाट धरली आणि “आक्रोश” या गंभीर चित्रपटातून पदार्पण करत, त्यांच्या कारकिर्दीला सुरुवात झाली. अच्युत पोतदार यांनी आपल्या आयुष्यात अनेक क्षेत्रांत मोलाची कामगिरी बजावली. भारतीय सैन्यात कॅप्टन पदावर सेवा केल्यानंतर ते इंडियन ऑइल कंपनीत उच्च पदावर कार्यरत होते. मात्र, अभिनयाची आवड मनात असल्याने त्यांनी 1980 च्या दशकात सिनेसृष्टीकडे वळत चार दशकांहून अधिक काळ रुपेरी पडद्यावर आपली छाप पाडली.
पोतदार यांनी आपल्या दीर्घ कारकिर्दीत 200 हून अधिक चित्रपट व अनेक दूरदर्शन मालिकांमध्ये काम केले. ‘3 इडियट्स’ या आमिर खानच्या गाजलेल्या चित्रपटात त्यांनी कॉलेजचे प्राचार्य ‘शास्त्री’ ही भूमिका साकारली होती, जी प्रेक्षकांच्या मनात आजही घर करून आहे.
त्यांचे काही उल्लेखनीय चित्रपट
- आक्रोश
- अर्धसत्य
- तेजाब
- परिंदा
- दिलवाले
- ये दिल्लगी
- रंगीला
- व्हाय अल्बर्ट पिंटो को गुस्सा आता है
- राजू बन गया जेंटलमन
चित्रपटांप्रमाणेच ‘वागले की दुनिया’, ‘माझा होशील ना’, आणि इतर मालिकांमधूनही त्यांनी प्रेक्षकांशी हृदयस्पर्शी संवाद साधला. अच्युत पोतदार हे केवळ अभिनेता नव्हते, तर एक आदर्श व्यक्तिमत्त्व होते. त्यांच्या जाण्याने एक संवेदनशील कलाकार, एक बुद्धिमान विचारवंत आणि एक नम्र माणूस हरपला आहे.

