( मुंबई )
सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना (MSME) आर्थिक बळकटी देण्यासाठी केंद्र सरकारच्या ‘इमर्जन्सी क्रेडिट लाईन गॅरंटी स्कीम 5.0’ (ECLGS 5.0) योजनेला आता अधिक गती देण्यात येत आहे. या योजनेचा व्यापक प्रसार आणि पात्र उद्योगांपर्यंत जलद कर्ज सुविधा पोहोचवण्यासाठी मुंबईतील नरिमन पॉईंट येथील यशवंतराव चव्हाण केंद्रात राज्यस्तरीय विशेष जनजागृती परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.
केंद्रीय वित्त मंत्रालयाच्या वित्तीय सेवा विभाग (DFS), नॅशनल क्रेडिट गॅरंटी ट्रस्टी कंपनी (NCGTC), ‘जनसमर्थ’ पोर्टल आणि पीएसबी अलायन्स प्रायव्हेट लिमिटेड यांच्या संयुक्त पुढाकारातून हा कार्यक्रम पार पडला. महाराष्ट्रातील सार्वजनिक आणि खासगी बँकांचे वरिष्ठ अधिकारी, एमएसएमई क्षेत्रातील प्रतिनिधी तसेच विविध व्यापारी संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उद्योगांसाठी डिजिटल आणि जलद कर्ज प्रक्रियेवर भर
परिषदेत ECLGS 5.0 योजनेअंतर्गत पात्र उद्योग आणि व्यावसायिकांना पारदर्शक, सुलभ आणि जलद पद्धतीने कर्ज उपलब्ध करून देण्यावर विशेष भर देण्यात आला. ‘जनसमर्थ’ या राष्ट्रीय डिजिटल पोर्टलद्वारे कर्ज अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन, कागदपत्रविरहित आणि वेगवान करण्यासाठी थेट प्रात्यक्षिक सादर करण्यात आले. बँकांनी तांत्रिक अडचणी दूर करून कॅश फ्लो आधारित क्रेडिट असेसमेंटला प्राधान्य द्यावे, तसेच उद्योगांना तातडीने आर्थिक मदत उपलब्ध करून द्यावी, असे आवाहन परिषदेत करण्यात आले.
100 टक्के क्रेडिट गॅरंटीमुळे मोठा दिलासा
ECLGS 5.0 योजनेचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे NCGTC मार्फत दिले जाणारे 100 टक्के क्रेडिट गॅरंटी कव्हरेज. यामुळे बँकांचा धोका कमी होणार असून पात्र उद्योगांना विनासंकोच आणि जलद कर्जपुरवठा करण्यास मदत होणार आहे. उद्योग क्षेत्रातील खेळते भांडवल टिकवून ठेवण्यासाठी ही योजना अत्यंत महत्त्वाची ठरणार असल्याचे मत परिषदेत व्यक्त करण्यात आले. विशेषतः MSME क्षेत्रातील लघुउद्योजक, व्यापारी आणि सेवा क्षेत्रातील व्यवसायांना या योजनेचा मोठा फायदा होणार आहे.
बँकिंग क्षेत्राचा सकारात्मक प्रतिसाद
कार्यक्रमात सहभागी झालेल्या सरकारी आणि खासगी बँकांच्या प्रतिनिधींनी ECLGS 5.0 योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी पूर्ण सहकार्य करण्याची ग्वाही दिली. शाखास्तरावर जनजागृती मोहीम राबविणे, MSME आणि रिटेल लोन प्रोसेसिंग सेंटर अधिक सक्रिय करणे आणि पात्र उद्योजकांना तातडीने मार्गदर्शन करणे यावरही भर देण्यात आला.
वित्तीय सेवा विभागाच्या उपसचिव गरिमा कपूर आणि अवर सचिव शैलेन्द्र कुमार हे दूरदृश्य प्रणालीद्वारे परिषदेत सहभागी झाले होते. तसेच नॅशनल क्रेडिट गॅरंटी ट्रस्टी कंपनीचे उपमहाप्रबंधक हृषिकेश सावंत, सहायक महाप्रबंधक अभिषेक मालवीय, पीएसबी अलायन्सचे मुख्य वित्तीय जोखीम अधिकारी दिलीप कुमार जैन आणि बँक ऑफ महाराष्ट्रचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. पात्र उद्योजक आणि व्यावसायिकांनी ECLGS 5.0 योजनेचा लाभ घेण्यासाठी आपल्या जवळच्या सरकारी किंवा खासगी बँकेच्या शाखेशी संपर्क साधावा किंवा ‘जनसमर्थ’ पोर्टलचा वापर करावा, असे आवाहन परिषदेत करण्यात आले.

