(पुणे)
पुण्यातील वानवडी भागात एक धक्कादायक घटना घडली आहे. भोपाळ येथील एम्समध्ये वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या बीड जिल्ह्यातील १८ वर्षीय विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. उत्कर्ष महादेव हिंगणे असे या तरुणाचे नाव असून, त्याने राहत्या ठिकाणी बाथरूममध्ये स्वतःचा गळा चिरून जीवन संपवले.
आत्महत्येपूर्वी उत्कर्षने व्हॉट्सअॅपवर एक पोस्ट लिहून सुसाईड नोटद्वारे आत्महत्येचे कारण सांगितले आहे. या नोटमध्ये त्याने अभ्यासाच्या ताणामुळे आत्महत्या करत असल्याचे स्पष्टपणे नमूद केले आहे. पोलिसांनी ही सुसाईड नोट जप्त केली असून, पुढील तपासासाठी ती तज्ज्ञांकडे पाठवण्यात आली आहे. सोमवारी सकाळी सुमारे ९:१५ वाजता या घटनेबाबत वानवडी पोलिसांना माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. पंचरत्न हाऊसिंग सोसायटी, वानवडी येथे उत्कर्षचा मृतदेह आढळून आला. बाथरूममध्ये गळा चिरलेल्या अवस्थेत तो मृत अवस्थेत सापडला.
पोलिसांनी घटनास्थळी तपास करताना उत्कर्षचा मोबाईल जप्त केला असून, त्यामध्ये व्हॉट्सअॅपवर लिहिलेली सुसाईड नोट सापडली आहे. त्यात त्याने स्पष्टपणे अभ्यासाच्या ताणाखाली असल्यामुळे आत्महत्येचा निर्णय घेतल्याचे लिहिले आहे. वानवडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सत्यजित आदम यांनी दिलेल्या माहितीनुसार, उत्कर्ष मूळचा बीड जिल्ह्यातील असून, नुकताच भोपाळ एम्समध्ये वैद्यकीय अभ्यासासाठी प्रवेश घेतला होता. तो एका कार्यक्रमासाठी पुण्यात आला असताना ही दुर्दैवी घटना घडली.