(पुणे)
समाजवादी चळवळीचे ज्येष्ठ प्रेरणास्थान, शेतकरी-कामगारांचे हक्कवादी नेते आणि थोर सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव (95) यांचे सोमवारी रात्री 8.25 वाजता पुण्यात निधन झाले. गेल्या काही महिन्यांपासून प्रकृती अस्वस्थ असून उपचार सुरू होते. प्रकृती गंभीर झाल्यानंतर त्यांना पुना हॉस्पिटलच्या अतिदक्षता विभागात हलवण्यात आले होते. उपचारांना साथ न देता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने कष्टकऱ्यांचा आवाज बुलंद करणारा समाजवादी विचारांचा ज्येष्ठ योद्धा हरपल्याची भावना राज्यभर व्यक्त होत आहे.
अवघ्या दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी रुग्णालयात जाऊन त्यांची भेट घेतली होती. गेल्या आठवड्यातच समाजवादी ज्येष्ठ नेते पन्नालाल सुराणा यांच्या निधनानंतर पवारांनी व्यक्त केलेल्या भावना अजून ताज्याच असताना आज आणखी एका विचारवंत नेत्याने कायमचा निरोप घेतला.
डॉ. अभिजित वैद्य यांच्या मार्गदर्शनाखाली तज्ज्ञ डॉक्टरांचा संघ उपचारात गुंतलेला असतानाही त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली नाही. गेल्या 10 ते 12 दिवसांपासून ते रुग्णालयात दाखल होते. आज सकाळी 10 वाजता त्यांचे पार्थिव हमाल भवन, मार्केटयार्ड येथे सार्वजनिक अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार असून सायंकाळी 4 ते 5 वाजण्याच्या सुमारास अंत्यसंस्कार होणार आहेत. त्यांच्या मागं पत्नी आणि असीम, अंबर अशी दोन मुलं आहेत.
कोण होते बाबा आढाव?
समाजवादी तत्त्वांना जीवनाचे अधिष्ठान मानणारे डॉ. बाबा आढाव यांनी कष्टकरी, हमाल, रिक्षाचालक, शेतमजूर आणि वंचित घटकांसाठी आयुष्यभर लढा दिला. 1970 च्या दशकात ते पुणे महापालिकेचे समाजवादी पक्षाचे नगरसेवक होते. ‘एक गाव, एक पाणवठा’ या सामाजिक समरसतेच्या ऐतिहासिक मोहिमेचे ते प्रणेते होते. रिक्षा पंचायतीचे नेतृत्व, हमाल-मालक संघटनांमधील समन्वय, आणि कामगारांच्या न्यायहक्कांसाठीचा त्यांच्या संघर्षाला महाराष्ट्राने नेहमीच दाद दिली.
बाबा आढाव यांचा जन्म १ जून १९३० रोजी पुण्यात झाला. त्या काळी शहरातील प्रमुख बाजारपेठा पेठांमधूनच भरत असत. पुण्यातच त्यांचे प्राथमिक शिक्षण झाले आणि पुढे त्यांनी वैद्यकीय शिक्षणही पुण्यातच पूर्ण केले. नाना पेठेत आयुर्वेदिक डॉक्टर म्हणून त्यांनी आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली.
त्या काळी नाना पेठ ही शहरातील मध्यवर्ती आणि गजबजलेली बाजारपेठ असल्याने, अनेक व्यापारी, मजूर आणि हमाल या भागात नियमितपणे येत असत. त्यांच्याशी सततचा संपर्क आल्यामुळे, हमाल आणि इतर कष्टकरी कामगारांना भेडसावणाऱ्या अनेक अडचणी बाबांच्या लक्षात येऊ लागल्या. या कामगारांना कोणतेही कायदेशीर संरक्षण नसल्याचे त्यांनी ओळखले आणि त्यांच्या समस्यांवर काम करण्याचा निर्धार केला.
१९५५ साली त्यांनी ‘हमाल पंचायत’ची स्थापना केली. या संघटनेच्या माध्यमातून त्यांनी हमाल कष्टकरी कामगारांच्या हक्कांसाठी सातत्याने लढा दिला. त्यांच्या अथक संघर्षाचे फलित म्हणून १९६९ साली महाराष्ट्र माथाडी, हमाल आणि इतर श्रमजीवी कामगार कायदा मंजूर झाला. असंघटित कामगारांना संरक्षण देणारा हा भारतातील पहिलाच कायदा ठरला. हमाल पंचायतच्या कार्यामुळे पुण्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील हमालांमध्ये संघटन आणि एकजूट निर्माण झाली.
कामगार हक्कांबरोबरच सामाजिक समतेसाठीही बाबांनी महत्त्वपूर्ण काम केलं. १९७२ मध्ये जातीय भेदभावाविरुद्ध उभ्या राहिलेल्या ‘एक गाव, एक पाणवठा’ या क्रांतिकारी चळवळीचेही त्यांनी नेतृत्व केले.
वयाच्या 93 व्या वर्षीही आंदोलन; परखड भूमिका कायम
शिवसेना आणि राष्ट्रवादीमधील फुटीनंतर देशातील राजकीय परिस्थितीवर त्यांनी निर्भीड भाष्य केले होते. “माणूस सकाळी कुठे असेल आणि संध्याकाळी कुठे असेल हे सांगता येत नाही; कारण सत्तेची भूक सर्वांची वाढली आहे. पण लक्षात ठेवा निर्णय 140 कोटी जनता घेणार,” असे शब्द त्यांनी उच्चारले होते. सत्तास्पर्धेच्या विलक्षण राजकारणावर त्यांनी टीका करत कठीण काळाचे भान ठेवण्याचे आवाहन केले होते.
कॅनडाहून कुटुंबीय विचारतात, “भारतामध्ये नक्की काय सुरू आहे?” असे सांगत त्यांनी राजकीय अस्थिरतेवर परखड मत मांडले होते. या सर्व घडामोडींमध्येही ते 93 व्या वर्षी रस्त्यावर उतरून आंदोलन करत राहिले हीच त्यांची तत्त्वनिष्ठा, आणि हीच त्यांची ओळख. बाबा आढावांच्या निधनाने महाराष्ट्राने लोकशाही मूल्यांचा प्रहरी, कष्टकऱ्यांचा खरा तारणहार आणि समाजवादी विचारवंत गमावला आहे.
नरेंद्र मोदी यांनी X या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करताना म्हटले की, बाबा आढाव हे विविध कारणांद्वारे समाजाची सेवा करण्याच्या त्यांच्या प्रयत्नांसाठी, विशेषतः उपेक्षितांना सक्षम बनवण्याच्या आणि कामगार कल्याणाच्या कार्यासाठी, स्मरणात राहतील. त्यांच्या निधनाने दुःख झाले आहे. त्यांच्या कुटुंबाप्रती आणि चाहत्यांसोबत माझ्या संवेदना आहेत, असे म्हणत नरेंद्र मोदी यांनी बाबा आढाव यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
काँग्रेस नेते आणि लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनीही X या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करताना म्हटले की, सामाजिक न्यायाचे एक मजबूत आधारस्तंभ आणि एक महान कामगार नेते बाबा आढाव यांच्या निधनाची बातमी अत्यंत दुःखद आणि कधीही भरून न निघणारे नुकसान आहे. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य वंचित, शोषित आणि कामगार वर्गाच्या हक्कांसाठी समर्पित केले. पुण्यातून निघालेल्या त्यांच्या संघर्षाच्या ज्योतीने देशभर सामाजिक न्यायाचा मार्ग उजळवला. या दुःखाच्या वेळी, मी त्यांच्या शोकाकुल कुटुंब आणि असंख्य सहकाऱ्यांप्रती माझ्या संवेदना व्यक्त करतो, असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे.

