( खेड / वार्ताहर )
कशेडी घाटातील नव्या मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर दरड कोसळून वाहतूक ठप्प झाल्यानंतर भाजप नेते ॲड. वैभव खेडेकर यांनी प्रशासनाच्या आपत्ती व्यवस्थापनावर तीव्र टीका केली आहे. कोकणात दरवर्षी पावसाळ्यात नैसर्गिक आपत्ती उद्भवत असतानाही प्रशासनाने प्रभावी नियोजन आणि आवश्यक यंत्रसामग्रीची उपलब्धता सुनिश्चित केली नसल्याचा आरोप त्यांनी केला.
ॲड. खेडेकर म्हणाले की, रात्री अडीच वाजल्यापासून शेकडो प्रवासी महामार्गावर अडकून पडले आहेत. वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न सुरू असले तरी महामार्गाच्या ठेकेदाराकडे आवश्यक यंत्रसामग्री उपलब्ध नसल्याने मदतकार्य संथ गतीने सुरू आहे. आपत्ती व्यवस्थापनाच्या बैठका नियमित घेतल्या जात असल्या, तरी प्रत्यक्ष संकटाच्या वेळी प्रशासनाची तयारी अपुरी असल्याचे या घटनेतून स्पष्ट झाल्याचा दावा त्यांनी केला.
घटनास्थळी पुरेशा प्रमाणात पोकलेन, डंपर आणि अन्य यंत्रसामग्री तैनात असती, तर अवघ्या दोन ते तीन तासांत महामार्ग वाहतुकीसाठी खुला झाला असता, असेही त्यांनी म्हटले. मात्र सध्या यंत्रसामग्रीच्या कमतरतेमुळे मदतकार्यात विलंब होत असून पुढील काही तासांतही रस्ता पहिल्यासारखा पूर्णपणे मोकळा होईल की नाही, याबाबत साशंकता असल्याचे त्यांनी नमूद केले.
महामार्गावर अडकलेल्या प्रवाशांसाठी अन्न, पिण्याचे पाणी आणि अन्य मूलभूत सुविधांचीही कोणतीही व्यवस्था करण्यात आली नसल्याचा आरोप करत त्यांनी प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
या घटनेतील जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी आणि राज्य विधिमंडळाच्या सुरू असलेल्या अधिवेशनात हा मुद्दा उपस्थित केला जाईल, असे ॲड. वैभव खेडेकर यांनी स्पष्ट केले. तसेच, सध्याच्या आपत्कालीन परिस्थितीत प्रशासनाला सहकार्य करून आवश्यक यंत्रसामग्री उपलब्ध करण्यासाठी आणि महामार्ग लवकरात लवकर वाहतुकीसाठी खुला करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.

