(जाकादेवी / संतोष पवार )
रत्नागिरी तालुक्यातील तात्यासाहेब मुळये माध्यमिक विद्यालय, जाकादेवी येथील इयत्ता आठवीत शिकणारा तरवळ येथील विद्यार्थी सर्वेश संदेश मायंगडे याने घरफोडी करणाऱ्या चोराला पकडण्यात दाखविलेल्या धाडस आणि प्रसंगावधानाबद्दल रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्याच्या वतीने त्याचा गौरव करण्यात आला. पोलीस निरीक्षक राजेंद्र यादव यांच्या हस्ते सर्वेशला प्रशस्तीपत्र, सन्मानचिन्ह आणि ५ हजार रुपयांचे रोख पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले.
काही दिवसांपूर्वी तरवळ येथील मायंगडेवाडी परिसरातील एका घरात चोरी होत असल्याचे सर्वेशच्या निदर्शनास आले. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून त्याने प्रसंगावधान राखत मोबाईलवर चोराचे चित्रीकरण केले आणि तातडीने घरमालकाला माहिती दिली. त्यानंतर घरमालकासोबत मोटारसायकलवरून चोराचा पाठलाग सुरू करण्यात आला.
पाठलागादरम्यान निवळी येथे चोराला गाठण्यात आले. त्याच्याशी संवाद साधत सर्वेशने धाडसाने त्याच्याच मोटारसायकलवर बसून त्याच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला. मात्र हातखंबा परिसरात पोहोचल्यानंतर चोराने सर्वेशला मोटारसायकलवरून खाली ढकलून पळून जाण्याचा प्रयत्न केला. तरीही सर्वेशने धैर्य न गमावता स्थानिक ग्रामस्थांची मदत घेतली आणि पोलिसांना संपूर्ण माहिती तसेच चित्रीकरणाचा पुरावा उपलब्ध करून दिला. या माहितीच्या आधारे रत्नागिरी ग्रामीण पोलिसांनी आरोपीला अटक केली. चौकशीत त्याने दोन घरांतून सुमारे ४३ हजार रुपयांची रोकड चोरल्याचे निष्पन्न झाले.
या उल्लेखनीय कामगिरीबद्दल पोलीस निरीक्षक राजेंद्र यादव आणि खालगाव बीट अंमलदार महेश टेमकर यांनी सर्वेशच्या धाडस, प्रसंगावधान आणि प्रामाणिकपणाचे विशेष कौतुक केले. यावेळी सर्वेश आणि त्याच्या पालकांचाही सन्मान करण्यात आला.
दरम्यान, ९ जुलै रोजी तात्यासाहेब मुळये माध्यमिक विद्यालयात आयोजित पालक सभेत शिक्षण संस्थेचे चेअरमन सुनील मयेकर आणि मुख्याध्यापक नितीन मोरे यांच्या हस्ते सर्वेश मायंगडेचा जाहीर सत्कार करण्यात येणार आहे.
विद्यार्थीदशेत दाखविलेल्या या धाडसामुळे सर्वेश मायंगडेवर परिसरातून अभिनंदनाचा वर्षाव होत असून त्याच्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
छायाचित्र : घरफोडीचा गुन्हा उघडकीस आणण्यात मोलाची भूमिका बजावल्याबद्दल सर्वेश मायंगडे आणि त्याच्या पालकांचा गौरव करताना रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र यादव.

