(देवळे / प्रकाश चाळके)
संगमेश्वर तालुक्यातील भडकंबा येथील दत्तवाडीत जलजीवन मिशनअंतर्गत नव्याने टाकण्यात आलेली पाणीपुरवठ्याची पाईपलाईन अज्ञात व्यक्तीने वारंवार फोडल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकारामुळे शासनाच्या योजनेचे आर्थिक नुकसान झाले असून ४५ कुटुंबांच्या पाणीपुरवठ्यावरही परिणाम झाला आहे. संबंधित संशयितावर तातडीने कठोर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली असून याबाबत लवकरच जिल्हा पोलीस अधीक्षकांची भेट घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.
भडकंबा दत्तवाडीत सुमारे ३५० लोकसंख्या असलेल्या ४५ कुटुंबांसाठी सुमारे २० वर्षांपूर्वी सार्वजनिक विहीर बांधण्यात आली होती. या विहिरीवर आधारित जलजीवन मिशनअंतर्गत नव्याने भूमिगत पाणीपुरवठा पाईपलाईन टाकण्यात आली. सुमारे अडीच ते तीन फूट खोलीवर ही पाईपलाईन टाकून विहिरीपासून पाण्याच्या टाकीपर्यंतचे काम पूर्ण करण्यात आले. ठेकेदाराने ग्रामस्थांच्या उपस्थितीत चाचणी घेतली असता पाणीपुरवठा सुरळीत सुरू असल्याचे दिसून आले. त्यानंतर घरगुती नळजोडणीचे काम सुरू होणार होते.
मात्र काही दिवसांतच अज्ञात व्यक्तीने लोखंडी हत्याराच्या साहाय्याने पाईपलाईनला छिद्र पाडून ती कापल्याचे निदर्शनास आले. ठेकेदाराने ती दुरुस्त करून पुन्हा चाचणी घेतली. मात्र त्यानंतर दुसऱ्याच ठिकाणी पुन्हा पाईपलाईन फोडण्यात आल्याची घटना घडली.
या प्रकाराची माहिती ग्रामस्थ आणि ठेकेदार यांनी ग्रामपंचायतीला दिल्यानंतर ग्रामपंचायतीने २४ जून २०२६ रोजी साखरपा पोलीस दूरक्षेत्राकडे संशयित व्यक्तीचे नाव नमूद करून तक्रार दाखल केली. तसेच या प्रकरणाची माहिती आमदार भैया सामंत यांनाही देण्यात आली असून संबंधितावर कठोर कारवाई करण्याच्या सूचना त्यांनी पोलिसांना दिल्याचे सांगण्यात आले.
मात्र तक्रार दाखल होऊनही अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नसल्याने भडकंबा दत्तवाडीतील ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी आहे. ऐन पावसाळ्यात पिण्याच्या पाण्याच्या योजनेत अडथळा निर्माण करणाऱ्या संबंधितावर तातडीने कठोर कारवाई करण्यात यावी, अन्यथा जिल्हा पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन न्याय मागणार असल्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

