(नागपूर)
विदर्भात उष्णतेची लाट दिवसेंदिवस अधिकच तीव्र होत असून बुधवारी (20 मे) सूर्याने अक्षरशः आग ओकली. वर्धा जिल्ह्यात तब्बल 47.1 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली असून हे केवळ विदर्भातीलच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील सर्वाधिक तापमान ठरले आहे. प्रादेशिक हवामान विभागाने दिलेल्या रेड, ऑरेंज आणि यलो अलर्टमुळे पुढील काही दिवस उष्णतेचा कहर आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
उष्णतेच्या लाटेने विदर्भातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. दुपारच्या वेळेत रस्ते ओस पडत असून नागरिक घराबाहेर पडणे टाळत आहेत. उष्माघात, डिहायड्रेशन आणि उकाड्यामुळे त्रस्त रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. दिवसासोबतच रात्रीही उकाड्याच्या झळा कायम असल्याने नागरिकांना दिलासा मिळत नाही.
वर्धा ठरले राज्यातील ‘हॉट डेस्टिनेशन’
बुधवारी वर्धा जिल्ह्याने उष्णतेचे सर्व विक्रम मोडीत काढत 47.1°C तापमानाची नोंद केली. रेड अलर्ट जारी असलेल्या या जिल्ह्यात दुपारच्या सुमारास रस्त्यांवर शुकशुकाट पाहायला मिळाला. वाढत्या तापमानामुळे शेती, बांधकाम आणि मैदानी कामांवरही परिणाम झाला आहे.
नागपुरात दशकातील सर्वाधिक तापमान
उपराजधानी नागपुरातही उष्णतेने विक्रमी झेप घेतली. बुधवारी नागपुरातील कमाल तापमान 46.6 अंश सेल्सिअसवर पोहोचले, जे गेल्या दहा वर्षांतील मे महिन्यातील सर्वाधिक तापमान मानले जात आहे. यापूर्वी 27 मे 2024 रोजी 45.6°C तापमानाची नोंद झाली होती. नागपुरातील सर्वकालीन उच्चांकी तापमानाचा विक्रम 47.9°C असून तो मे 2013 मध्ये नोंदविण्यात आला होता. सध्याच्या वाढत्या तापमानाचा वेग पाहता हा विक्रमही धोक्यात येण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे.
विदर्भातील 9 शहरांचा पारा 44 अंशांच्या पुढे
विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये तीव्र उष्णतेची परिस्थिती कायम आहे. अमरावतीमध्ये मंगळवारी 46.8°C तापमानाची नोंद झाल्यानंतर बुधवारी किंचित घट होऊन तापमान 46.4°C वर आले. मात्र उकाडा आणि गरम वाऱ्यांचा त्रास कायम होता. विदर्भातील अकरापैकी नऊ शहरांचे तापमान 44 अंशांच्या पुढे गेले असून नागरिक हैराण झाले आहेत. पंखे आणि कुलरदेखील निष्प्रभ ठरत असल्याने उष्णतेपासून बचावासाठी नागरिक विविध उपाय करत आहेत.
पुढील काही दिवस आणखी धोकादायक
प्रादेशिक हवामान विभागाने वर्धा, अमरावती आणि अकोला जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी केला आहे. नागपूर, चंद्रपूर आणि यवतमाळ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून पुढील तीन ते चार दिवस तापमानात आणखी वाढ होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. आरोग्य विभागाने नागरिकांना दुपारच्या वेळेत घराबाहेर पडणे टाळण्याचे, पुरेसे पाणी पिण्याचे आणि उष्माघातापासून सावध राहण्याचे आवाहन केले आहे.
विदर्भातील कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये)
- वर्धा – 47.1°C
- नागपूर – 46.6°C
- अमरावती – 46.4°C
- चंद्रपूर – 46.2°C
- गडचिरोली – 45.6°C
- अकोला – 45.2°C
- यवतमाळ – 45.2°C
- गोंदिया – 44.9°C
- भंडारा – 44.6°C
- वाशीम – 42.6°C
- बुलडाणा – 41.0°C

