(दापोली / वार्ताहर)
दापोली तालुक्यातील हर्णै समुद्रकिनारी सुरू असलेल्या जेटी बांधकामादरम्यान बुधवारी सकाळी एक मोठी दुर्घटना घडली. दगड आणि माती वाहतूक करणारा डंपर भरतीच्या पाण्यात अडकून पूर्णपणे बुडाल्याने परिसरात खळबळ उडाली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली, तरी जेटी कामातील सुरक्षाविषयक उपाययोजनांवर पुन्हा प्रश्न उपस्थित झाले आहेत.
उपलब्ध माहितीनुसार, जेटी बांधकामासाठी लागणारे दगड व माती समुद्रकिनाऱ्यावरून डंपरद्वारे वाहून नेण्याचे काम सुरू होते. बुधवारी सकाळी साहित्य उतरवून डंपर माघारी फिरत असताना किनाऱ्यावरील मऊ वाळूमध्ये त्याचे एक चाक खोलवर रुतले. चालकाने वाहन बाहेर काढण्याचा प्रयत्न केला; मात्र डंपर अधिकच वाळूत अडकत गेला. दरम्यान, काही वेळातच समुद्रात भरती सुरू झाल्याने पाणी वेगाने वाढू लागले आणि अखेर संपूर्ण डंपर समुद्राच्या पाण्यात बुडाला.
या घटनेमुळे हर्णै जेटी कामाच्या सुरक्षेवर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यातही अशाच प्रकारची घटना घडली होती. त्यावेळी एक डंपर कातळावर आदळून भरतीच्या पाण्यात अडकला होता. वारंवार घडणाऱ्या घटनांमुळे समुद्रकिनारी सुरू असलेल्या बांधकामांसाठी सुरक्षित मार्ग, तांत्रिक नियोजन आणि आपत्कालीन उपाययोजना तातडीने राबविण्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.
दरम्यान, या घटनेचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून हर्णै जेटी कामातील निष्काळजीपणावर नागरिकांकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

