(मुंबई)
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या लाखो उमेदवारांसाठी मोठा आणि दिलासादायक निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र गट-क सेवा अंतर्गत येणाऱ्या लिपिक-टंकलेखक आणि कर सहाय्यक पदांसाठी घेतली जाणारी टंकलेखन कौशल्य चाचणी आता पूर्णपणे रद्द करण्यात आली आहे. आयोगाने बुधवारी (20 मे 2026) यासंदर्भातील अधिकृत परिपत्रक जारी केले. या निर्णयामुळे भरती प्रक्रिया अधिक वेगवान आणि सुटसुटीत होणार असून अंतिम निकाल जाहीर होण्यास होणारा विलंब कमी होणार आहे. स्पर्धा परीक्षा क्षेत्रातून आयोगाच्या या निर्णयाचे जोरदार स्वागत करण्यात येत आहे.
MPSC च्या 205 व्या बैठकीत महत्त्वाचा निर्णय
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या 24 एप्रिल 2026 रोजी झालेल्या 205 व्या बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला होता. आयोगाने स्पष्ट केले की, हा बदल बैठकीच्या दिनांकापासून म्हणजेच 24 एप्रिल 2026 पासून तात्काळ लागू करण्यात आला आहे. यापूर्वी उमेदवारांकडे शासनमान्य टंकलेखन प्रमाणपत्र असतानाही आयोगाकडून स्वतंत्र टंकलेखन कौशल्य चाचणी घेतली जात होती. त्यामुळे उमेदवारांना एकाच कौशल्याची दोनदा परीक्षा द्यावी लागत होती. या प्रक्रियेमुळे अंतिम निकाल लागण्यास मोठा विलंब होत असल्याची तक्रार सातत्याने होत होती.
आता परीक्षा प्रक्रिया कशी असणार?
नव्या नियमांनुसार आता उमेदवारांना फक्त पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा द्यावी लागणार आहे. मुख्य परीक्षेतील गुणांच्या आधारे अंतिम गुणवत्ता यादी तयार केली जाईल आणि पात्र उमेदवारांची शिफारस शासनाकडे पाठवली जाईल. मात्र, उमेदवारांकडे अर्ज भरण्यापूर्वीच शासनमान्य टंकलेखन प्रमाणपत्र असणे अनिवार्य राहणार आहे. तसेच जाहिरातीत नमूद केलेल्या सर्व शैक्षणिक आणि तांत्रिक अर्हता विहित मुदतीत पूर्ण केलेल्या असणे आवश्यक असेल.
प्रमाणपत्रांची पडताळणी आता शासन स्तरावर
आयोगाच्या नव्या निर्णयानुसार मुख्य परीक्षा उत्तीर्ण उमेदवारांची अंतिम यादी थेट शासनाकडे पाठवली जाईल. त्यानंतर संबंधित विभागाकडून उमेदवारांच्या टंकलेखन प्रमाणपत्रांची मूळ पडताळणी आणि खातरजमा केली जाणार आहे. या प्रक्रियेमुळे आयोगावरचा अतिरिक्त ताण कमी होणार असून भरती प्रक्रिया वेळेत पूर्ण करण्यास मदत होईल, असे सांगितले जात आहे.
निकाल लवकर लागणार, उमेदवारांचा ताण कमी
आयोगाचे सचिव महेंद्र हरपाळकर यांनी सांगितले की, ज्या उमेदवारांकडे टंकलेखन प्रमाणपत्र आहे तेच उमेदवार पूर्व व मुख्य परीक्षेस पात्र ठरत असल्याने मुख्य परीक्षेनंतर पुन्हा कौशल्य चाचणी घेण्याची आवश्यकता उरत नाही. त्यामुळे भरती प्रक्रियेत होणारा विलंब टाळण्यास मदत होणार आहे. या निर्णयामुळे उमेदवारांचा मानसिक ताण कमी होणार असून निकाल वेळेत लागण्याची शक्यता वाढली आहे. स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांकडून सोशल मीडियावर आयोगाच्या या निर्णयाचे स्वागत केले जात आहे.

