( रत्नागिरी )
मुंबई-गोवा आणि मिऱ्या-नागपूर या दोन प्रमुख राष्ट्रीय महामार्गांच्या संगमावर असलेल्या पाली बाजारपेठेतील बहुप्रतीक्षित उड्डाणपूल अखेर आज सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. या पुलामुळे पाली परिसरातील वाहतूककोंडीचा दीर्घकालीन प्रश्न मार्गी लागणार असून स्थानिक नागरिकांसह हजारो वाहनचालकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
पाली गावातून जाणाऱ्या महामार्गावर दररोज वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत होत्या. त्यामुळे शाळकरी विद्यार्थी, रुग्णवाहिका, शेतकरी, व्यापारी आणि दैनंदिन प्रवास करणाऱ्या नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. आता उड्डाणपूल सुरू झाल्याने वाहतूक अधिक सुरक्षित, जलद आणि सुरळीत होणार आहे.
या पुलामुळे रत्नागिरी शहराकडे तसेच परिसरातील गावांकडे जाणारी वाहतूक गतिमान होणार असून विशेषतः रुग्णवाहिका, शालेय बस आणि अन्य आपत्कालीन सेवांना मोठा फायदा होणार आहे. वाहतूककोंडी, वेळेचा अपव्यय आणि अपघाताचा धोका लक्षणीयरीत्या कमी होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला झाल्यानंतर स्थानिक नागरिक आणि वाहनचालकांनी समाधान व्यक्त करत प्रशासन तसेच हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी योगदान देणाऱ्या सर्व संबंधित यंत्रणांचे आभार मानले.
मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणादरम्यान पाली बाजारपेठेतील स्थानिक व्यापाऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर विस्थापन टाळण्यासाठी या उड्डाणपुलाला मंजुरी देण्यात आली होती.
२०१७ मध्ये राष्ट्रीय महामार्ग विभागाने सुरुवातीला ३५० मीटर लांबीचा आणि १७ खांबांचा पूल मंजूर केला होता. मात्र, २०२४ मध्ये आराखड्यात बदल करून पुलाची रचना अधिक सक्षम करण्यात आली. नव्या आराखड्यानुसार प्रत्येकी १० मीटर अंतरावर आणखी १७ खांबांची भर घालण्यात आली असून, एकूण ३४ ते ३५ खांबांवर हा उड्डाणपूल उभारण्यात आला आहे. त्यामुळे पुलाची क्षमता आणि सुरक्षितता अधिक वाढली आहे.

