(रत्नागिरी/ प्रतिनिधी )
रत्नागिरी जिल्ह्यात पत्रकार दीपक भागवत यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद आता अधिक तीव्रतेने उमटू लागले असून, पत्रकार सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा केंद्रस्थानी आला आहे. घटनेचा निषेध नोंदवत आणि दोषींवर तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणी करत मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने सोमवारी जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांना सविस्तर निवेदन सादर करण्यात आले.
पत्रकारितेच्या क्षेत्रात निर्भीड भूमिका आणि प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन वार्तांकन करण्यासाठी ओळखले जाणारे दीपक भागवत यांच्यावर चिपळूणमध्ये भरदिवसा झालेल्या हल्ल्याने जिल्ह्यातील पत्रकारांमध्ये तीव्र अस्वस्थता निर्माण झाली आहे. पत्रकारांवर अशा प्रकारे हात उचलला जाणे म्हणजे केवळ एका व्यक्तीवरील आक्रमण नसून अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरचा थेट प्रहार असल्याची भावना पत्रकारवर्तुळातून व्यक्त होत आहे.
मराठी पत्रकार परिषदेच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेत या प्रकरणातील गांभीर्य अधोरेखित केले आहे. निवेदनाद्वारे पत्रकार संरक्षणासाठी अस्तित्वात असलेल्या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याची आवश्यकता अधोरेखित करण्यात आली असून प्रतिनिधींनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, पत्रकारांवरील हल्ले ही वाढती चिंतेची बाब असून, महाराष्ट्र पत्रकार व प्रसारमाध्यम संस्था (हिंसक कृत्य व मालमत्तेची हानी प्रतिबंध) कायदा, २०१७ अधिक कठोरतेने राबवला जाणे आवश्यक आहे.
तसेच या प्रकरणातील मुख्य सूत्रधारांचा शोध घेऊन त्यांच्यावर तातडीने कठोर कारवाई व्हावी, अन्यथा पत्रकार संघटना आंदोलनाचा मार्ग स्वीकारतील, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला. पत्रकारांच्या मते, वार्तांकन करत असताना पत्रकाराला लक्ष्य करणे म्हणजे लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावर दबाव आणण्याचा प्रयत्न मानला जावा. जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी निवेदन स्वीकारताना प्रशासन या घटनेकडे गांभीर्याने पाहत असल्याचे स्पष्ट केले आहे. संबंधित प्रकरणाचा सखोल तपास करण्यासाठी पोलिसांना सूचना दिल्या जातील आणि कायद्याच्या चौकटीत कोणालाही संरक्षण दिले जाणार नाही, अशी भूमिका त्यांनी मांडली आहे.
या भेटीदरम्यान मराठी पत्रकार परिषदेचे पदाधिकारी, सदस्य आणि जिल्ह्यातील पत्रकार उपस्थित होते. निवेदनानंतर आता पुढील प्रत्यक्ष कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले असून, आरोपींविरुद्ध पोलिस प्रशासन कोणती ठोस पावले उचलते, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.
….तरच कायद्यावरील विश्वास अधिक बळकट राहील
अशा प्रकारच्या उघड हल्ल्यानंतर आता रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी या प्रकरणात अधिक ठाम भूमिका घेणे अपेक्षित असल्याची भावना आता व्यक्त होत आहे. कारण पत्रकारावर भरदिवसा हल्ला होणे, घटनेचे दृश्य पुरावे समोर येणे आणि त्यानंतरही प्रत्यक्ष अटकेस विलंब होणे, यामुळे समाजात अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. पोलिस प्रशासनाकडून निष्पक्ष आणि वेगवान कारवाईचा स्पष्ट संदेश गेला, तरच कायद्यावरील विश्वास अधिक बळकट राहू शकतो. पत्रकार हा लोकशाहीतील संवेदनशील घटक असल्याने त्याच्या सुरक्षिततेबाबत प्रशासनाने तातडीने ठोस पावले उचलणे ही केवळ प्रक्रियात्मक जबाबदारी नसून सार्वजनिक विश्वास टिकवण्याचीही गरज आहे. त्यामुळे या प्रकरणात हल्लेखोरांवर अटकेची कारवाई होणार की नाही? याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

