( कोल्हापूर )
कोल्हापूर जिल्ह्यातील आदमपूर येथील श्रीक्षेत्रात संत सद्गुरू बाळूमामा यांच्या प्रसिद्ध भंडारा यात्रेला पारंपरिक वाद्यांचा गजर, अश्वांचे नृत्य आणि “बाळूमामांच्या नावानं चांगभलं”च्या जयघोषात सुरुवात झाली. लाखो भाविकांच्या उपस्थितीत रविवारी बाळूमामांचा भव्य रथोत्सव उत्साहात पार पडला. दरवर्षी या यात्रेसाठी महाराष्ट्रासह कर्नाटकातून मोठ्या संख्येने भाविक दाखल होतात. यंदाही यात्रेला प्रचंड प्रतिसाद मिळाला असून सोमवारी जागरादिवशी विविध राज्यांतून लाखो भाविक आदमापूर येथे आले आहेत.
हेलिकॉप्टरने दूधघागर आणि पुष्पवर्षाव
यात्रेदरम्यान सोमवारी सकाळी बकऱ्यांच्या बग्यातील दुधाची घागर हेलिकॉप्टरने आणण्यात आली. दुपारी मंदिर परिसरावर हेलिकॉप्टरद्वारे पुष्पवर्षाव करण्यात आला. यावेळी भाविकांनी “जय बाळू मामा” आणि “बाळूमामांच्या नावानं चांगभलं” अशा घोषणा देत भक्तीमय वातावरण निर्माण केले. भाविकांच्या सोयीसाठी यंदा मुख्य दर्शन रांग, मुखदर्शन आणि बाहेरून दर्शन अशी व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच वाहन पार्किंगचीही विशेष सोय करण्यात आली आहे.
चांदीच्या मूर्तीचा भव्य रथ
धनगर समाजातील भाविकांनी सुमारे एक कोटी रुपये खर्च करून देवस्थानला अर्पण केलेल्या भव्य रथात संत बाळूमामा यांची १३८ किलो वजनाची चांदीची मूर्ती विराजमान करण्यात आली होती. या मूर्तीच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली.
भाकणुकीत हवामान बदल आणि संकटांचे संकेत
यात्रेतील पारंपरिक भाकणुकीच्या कार्यक्रमात कृष्णात डोणे महाराज वाघापूरकर यांनी विविध विषयांवर भविष्यवाणी केली. हवामान बदलामुळे ऋतूचक्र विस्कळीत होईल, अवकाळी पावसाचे प्रमाण वाढेल आणि काही भागात दुष्काळ पडण्याची शक्यता असल्याचे त्यांनी सांगितले. नद्या, तलाव आणि जलाशय आटण्याचा धोका असून सुनामी, वादळ आणि भूकंपासारख्या नैसर्गिक आपत्तींचा धोका वाढू शकतो, असेही त्यांनी भाकीत केले. अशी मान्यता आहे की, ही भाकीते बाळामामांचे असतात जे शब्दात कृष्णात डोणे महाराज वाघापूरकर सांगतात.
जागतिक तणाव आणि राजकीय उलथापालथ
भाकणुकीत जागतिक स्तरावर तणाव वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली. भारत-पाकिस्तान संबंधांमध्ये तणाव वाढण्याचे संकेतही त्यांनी दिले. भारत – पाकिस्तानमध्येही युद्ध होणार असंही भाकीत त्यांनी केलंय. या युद्धात भारतीय सैनिक सीमेवर शौर्याने भारतीयांची मान अभिमानाने उंचणार आहेत. एवढंच नाही तर पाकिस्तानचा काही भाग भारतीय सैनिक आपल्या ताब्यात घेण्यात यशस्वी होणार आहे. दुसरीकडे रेल्वे, मोटार आणि विमान अपघातांच्या घटनाही वाढ होणार आहेत. तसेच राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता असून काही मोठे राजकीय नेते घोटाळ्यांत अडकू शकतात, असेही त्यांनी सांगितले.
महागाई आणि अर्थव्यवस्थेचा अंदाज
त्यांनी सर्वात मोठं भाकीत केलं की, भारतातील मोठ्या नेत्याची हत्या होणार आहे. महागाई वाढून सर्वसामान्य नागरिकांचे जीवन कठीण होईल, तसेच सोन्याच्या किमतीत मोठी वाढ होण्याची शक्यता असल्याचेही भाकीत करण्यात आले. मात्र आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार सुरू असले तरी भारतीय उत्पादनांना मागणी वाढेल, असेही त्यांनी नमूद केले. समान नागरी कायदा लागू होणार असंही भाकीत त्यांनी केलं आहे.
भाकणुकीत पुढे असेही सांगण्यात आले की, भविष्यात मानवाला विविध प्रकारचे आजार होण्याचे प्रमाण वाढेल आणि त्यामुळे मानवी आयुर्मान घटण्याची शक्यता आहे. धक्कादायक भाकित करताना असेही नमूद करण्यात आले की, सामाजिक मूल्यांमध्ये अधःपतन होऊन अत्यंत कमी वयात मातृत्वाच्या घटना घडू शकतात, तर तरुण पिढी चुकीच्या मार्गाला लागण्याची भीती व्यक्त करण्यात आली.
याशिवाय काही विलक्षण आणि चिंताजनक संकेतही या भाकणुकीत व्यक्त करण्यात आले. त्यामध्ये मेंढीच्या पोटी मानव बाळ जन्माला येईल, कर्नाटकातील एखाद्या जलाशयाला मोठी भगदाड पडून जीवितहानी होईल, तसेच कोल्हापूरच्या महालक्ष्मी देवळातील महालक्ष्मी देवीच्या नेत्रातून रात्रीच्या वेळी पाणी येईल, असेही सांगण्यात आले.
तसेच भारतात दहशतवादी हल्ल्यांचा धोका वाढून बॉम्बस्फोटांच्या घटना घडू शकतात, आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये मोठी उलथापालथ होऊन काही काळ त्या बंद राहू शकतात, असेही भाकीत करण्यात आले. सामाजिक नातेसंबंधांमध्येही अधःपतन होऊन भावंडांच्या पवित्र नात्यावरही काळिमा फासला जाईल, असा इशाराही या भाकणुकीत देण्यात आला.
या भाकणुकीचा कार्यक्रम ऐकण्यासाठी देवस्थानचे अध्यक्ष धैर्यशील भोसले यांच्यासह हजारो भाविक उपस्थित होते. या भाकितांपैकी किती सत्य ठरतात हे येणारा काळच ठरवेल, असे भाविकांमध्ये बोलले जात आहे.

