( मुंबई )
महाराष्ट्रात रिक्षाचालकांसाठी मराठी भाषा अनिवार्य करण्याच्या निर्णयावरून राज्यातील राजकीय आणि सामाजिक वातावरण तापले असतानाच अभिनेते व राज्य परिवहन महामंडळाचे (एसटी) नवनिर्वाचित ब्रँड अँबेसिडर रितेश विलासराव देशमुख यांनी या निर्णयाचे जोरदार समर्थन केले आहे. “महाराष्ट्रात मराठी भाषा अनिवार्य असायलाच हवी,” असे स्पष्ट आणि ठाम मत त्यांनी व्यक्त केले.
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी घेतलेल्या निर्णयाचे समर्थन करताना रितेश देशमुख म्हणाले, “महाराष्ट्रात राहताना आणि प्रवास करताना मराठी बोललीच पाहिजे. आपण दुसऱ्या राज्यात गेल्यावर तिथली भाषा आत्मसात करतो, तसेच महाराष्ट्रात मराठीचे महत्त्व असणे गरजेचे आहे. त्यामुळे हा निर्णय योग्यच आहे.”
राज्यात रिक्षाचालकांना मराठी भाषा येणे बंधनकारक करण्याच्या प्रस्तावामुळे विविध स्तरांवर चर्चा सुरू झाली आहे. काहींनी या निर्णयाचे स्वागत केले असून, तर काहींनी विरोध दर्शवला आहे. मात्र, या वादात आता सेलिब्रिटींचीही एंट्री झाली असून रितेश देशमुख यांच्या भूमिकेमुळे या विषयाला अधिक चर्चेचे वळण मिळाले आहे.
दरम्यान, रितेश देशमुख आणि जिनिलिया देशमुख यांची Maharashtra State Road Transport Corporation (महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ) चे ब्रँड अँबेसिडर म्हणून पाच वर्षांसाठी निवड करण्यात आली आहे. या निवडीबद्दल बोलताना रितेश देशमुख भावूक झाले. त्यांनी आपल्या वडिलांच्या आठवणींना उजाळा देताना सांगितले की, “माझे वडील विलासराव देशमुख हे लातूर-पुणे असा प्रवास अनेकदा एसटीनेच करत. त्यांनी परिवहन खात्याची जबाबदारीही सांभाळली होती. आजही आमच्या बाभळगाव येथील घरात त्यांचा एसटीच्या खिडकीत बसलेला फोटो आहे, जो आमच्यासाठी खूप खास आहे. “एसटी माझ्या आणि आमच्या कुटुंबाच्या आयुष्याचा अविभाज्य भाग राहिली आहे. आज तिचाच ब्रँड अँबेसिडर होणे, हा माझ्यासाठी अभिमानाचा क्षण आहे,” असेही त्यांनी सांगितले. यावेळी रितेश देशमुख यांनी ‘ड्रिंक अँड ड्राईव्ह’मुळे होणारे अपघात टाळण्यासाठी नागरिकांनी वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहनही केले.
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या ‘व्हिजन’चे कौतुक करताना रितेश देशमुख यांनी एसटी सेवेत होणाऱ्या बदलांवरही भाष्य केले. आगामी काळात एसटी ताफ्यात मोठ्या प्रमाणावर इलेक्ट्रिक बसेस दाखल होणार असून, संपूर्ण सेवा प्रदूषणमुक्त करण्याचा संकल्प करण्यात आला आहे.

