(रत्नागिरी / वार्ताहर)
सामाजिक, शैक्षणिक आणि कायदेविषयक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे अभ्यासू व्यक्तिमत्त्व तथा माहिती अधिकार चळवळीतील सक्रिय कार्यकर्ते योगेश तानू पेढांबकर यांची अँटी करप्शन बोर्ड, दिल्लीमार्फत महाराष्ट्र राज्य सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या नियुक्तीमुळे रत्नागिरी जिल्ह्यासह संपूर्ण राज्यातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
शिक्षक, पत्रकार आणि माहिती अधिकार जिल्हाध्यक्ष म्हणून कार्यरत असलेल्या योगेश पेढांबकर यांनी सामाजिक बांधिलकी जपत अनेक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग नोंदवला आहे. गोरगरीब, अन्यायग्रस्त तसेच गरजू नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी सातत्याने कार्य केले आहे. विशेषतः निराधार महिलांना कुटुंबव्यवस्था उभी करण्यासाठी त्यांनी केलेले कार्य उल्लेखनीय मानले जाते.
सध्या ते विधी शिक्षण घेत असून माहिती अधिकार कायदा, लोकसेवा हक्क कायदा, दप्तर दिरंगाई कायदा यांसह विविध कायदेविषयक बाबींमध्ये त्यांचा सखोल अभ्यास आहे. सामान्य नागरिकांना मोफत कायदेशीर मार्गदर्शन मिळावे यासाठी त्यांनी अनेकांना विनामूल्य सल्ला देत आहेत.
“महाराष्ट्र न्याय व पाठपुरावा” या माध्यमातून त्यांनी कायदेविषयक जनजागृतीचे प्रभावी काम उभे केले आहे. विविध सोशल माध्यम गटांच्या सहाय्याने ते नागरिकांना माहिती अधिकार, सामाजिक न्याय आणि कायदेशीर प्रक्रियेबाबत मार्गदर्शन करत आहेत. गावपातळीपासून राज्य आणि राष्ट्रीय स्तरापर्यंत त्यांनी सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात आपला ठसा उमटवला आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात गरजू आणि निराधार लोकांसाठी आधारवड म्हणून त्यांची स्वतंत्र ओळख निर्माण झाली आहे. त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांच्यावर महाराष्ट्र राज्य सचिवपदाची महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपविण्यात आली आहे. या निवडीबद्दल सामाजिक, शैक्षणिक, पत्रकारिता आणि विधी क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत असून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या जात आहेत.
नियुक्तीबाबत प्रतिक्रिया देताना योगेश पेढांबकर म्हणाले, “समाजाने मला खूप काही दिले आहे. आता समाजासाठी अधिक व्यापक स्वरूपात कार्य करण्याची वेळ आली आहे. न्याय आणि जनहितासाठी माझे कार्य अविरत सुरू राहील.” त्यांच्या या नियुक्तीचे महाराष्ट्रभर विशेष कौतुक होत आहे.

