(दापोली)
राष्ट्र सेविका समिती, दापोली तालुक्याचा बाल, तरुणी व गृहिणींसाठी आयोजित एक दिवसीय निवासी वर्ग दापोली शिक्षण संस्थेच्या राजीव जोशी सभागृहात मोठ्या उत्साहात पार पडला. या वर्गात एकूण ७६ सेविकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
महिला सबलीकरण व सक्षमीकरण या उद्देशाने वर्गामध्ये विविध उपक्रम घेण्यात आले. यात खेळ, लेझीम, पद्य वाचन, स्वसंरक्षण प्रशिक्षण आदींचा समावेश होता.
कोकण प्रांत सहकार्यवाहीका उमाताई दांडेकर यांनी आपल्या बौद्धिक सत्रात समितीच्या पूर्व प्रमुख संचालिकांचे जीवनचरित्र उपस्थितांना सांगितले. त्याचबरोबर नव्या पिढीला भजन परंपरेची ओळख व्हावी या हेतूने प्रगती महिला मंडळ, दुबळेवाडी-गिम्हवणे यांच्या महिला कलाकारांनी सुश्राव्य भजन सादर केले.
जिल्हा सहकार्यवाहीका मंजुषाताई वैद्य यांनी आभार मानले. यावेळी ज्येष्ठ सेविकांच्या हस्ते देवी अहिल्याबाई होळकर यांच्या ३५० व्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या जीवनचरित्राची छोटी पुस्तिका उपस्थित भजनी महिलांना देण्यात आली.
या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी तालुका कार्यकारिणी सदस्य, शिक्षिका व प्रबंधिकांनी विशेष परिश्रम घेतले.

