( रत्नागिरी )
महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागाच्या वतीने ज्येष्ठ साहित्यिक, कोकण मराठी साहित्य परिषदेचे संस्थापक अध्यक्ष आणि पद्मश्री पुरस्काराने सन्मानित मधु मंगेश कर्णिक यांच्या गौरवार्थ ‘मधुभाई : साहित्य, समाज कृतज्ञता सोहळा’ आयोजित करण्यात आला आहे. या निमित्ताने त्यांच्या दीर्घ आणि समृद्ध साहित्यिक प्रवासावर आधारित भव्य नागरी सत्कार व प्रकट मुलाखत शनिवार, दिनांक १४ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी ४ वाजता स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर नाट्यगृह, रत्नागिरी येथे संपन्न होणार आहे.
महाराष्ट्र शासनाचा मराठी भाषा विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय रत्नागिरी आणि कोकण मराठी साहित्य परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून, कोकणातील सर्वसामान्यांचे जनजीवन, सामाजिक वास्तव, सांस्कृतिक जाणिवा आणि विविध विषय आपल्या सिद्धहस्त लेखणीद्वारे साहित्याच्या मुख्य प्रवाहात आणणाऱ्या मधु मंगेश कर्णिक यांच्या साहित्यिक योगदानाचा हा सन्मान आहे.
कोकणातील नव्या लेखकांना हक्काचे व्यासपीठ मिळावे या उद्देशाने त्यांनी स्थापन केलेली कोकण मराठी साहित्य परिषद ही आज एक प्रभावी आणि व्यापक साहित्य चळवळ म्हणून ओळखली जाते.
महाराष्ट्र शासनाचे मराठी भाषा मंत्री आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार डॉ. उदय सामंत हे मराठी भाषा, मराठी साहित्य आणि साहित्य चळवळ अधिक व्यापक व्हावी यासाठी सातत्याने विविध उपक्रम राबवत आहेत. त्याच अनुषंगाने त्यांनी पुढाकार घेऊन गेल्या अनेक दशकांपासून साहित्य क्षेत्रात भरीव योगदान देणारे, तसेच कोकणातील नवसाहित्यिकांना व्यासपीठ मिळावे या हेतूने कोकण मराठी साहित्य परिषदेची स्थापना करणारे पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांचा नागरी सत्कार सोहळा त्यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित केला आहे.
हा नागरी सत्कार महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार असून, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष विश्वास पाटील आणि रत्नागिरी नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा शिल्पाताई सुर्वे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
याच कार्यक्रमाच्या निमित्ताने पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांच्या आजवरच्या अनुभवविश्वावर आधारित प्रकट मुलाखत आयोजित करण्यात आली आहे. ही मुलाखत कोकण मराठी साहित्य परिषदेच्या केंद्रीय अध्यक्षा नमिता कीर, केंद्रीय कार्याध्यक्ष प्रा. डॉ. प्रदीप ढवळ, ज्येष्ठ साहित्यिक अशोक बागवे, ज्येष्ठ कवी अरुण म्हात्रे आणि अभिजित हेगशेट्ये घेणार असून, या संवादातून मधुभाईंचा साहित्यिक, सामाजिक आणि संस्थात्मक प्रवास रसिकांसमोर उलगडणार आहे.
या सोहळ्याचे आणखी एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे कोकणातील सात जिल्ह्यांतील अनेक नामवंत लेखकांनी मधु मंगेश कर्णिक यांच्या कार्यावर आधारित लिहिलेल्या गौरव अंकाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात येणार आहे.
कार्यक्रमाच्या पूर्वतयारीसाठी आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना कोकण मराठी साहित्य परिषदेच्या केंद्रीय अध्यक्षा नमिता कीर यांनी सांगितले की, मधु मंगेश कर्णिक हे केवळ साहित्यिक नसून त्यांनी साहित्याच्या पलीकडे जाऊन संस्थात्मक बांधणीचा मोठा ध्यास घेतला. नव्या लेखकांना हक्काचे व्यासपीठ मिळावे या हेतूने त्यांनी उभी केलेली ‘कोमसाप’ ही आज महाराष्ट्राच्या साहित्यिक अस्मितेचा एक महत्त्वाचा भाग बनली आहे. १९६० च्या दशकात मालगुंड येथे कवी केशवसुत यांचे स्मारक उभारण्यासाठी त्यांनी घेतलेले परिश्रम आणि केलेले कार्य अद्वितीय असल्याचे त्यांनी नमूद केले. एका सर्वसामान्य कुटुंबातून सुरू झालेला त्यांचा प्रवास अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदापर्यंत कसा पोहोचला, हे या प्रकट मुलाखतीतून उलगडणार आहे.
रत्नागिरी ही मधुभाईंची कर्मभूमी आहे. “रत्नागिरीने मला साहित्यिक म्हणून जगण्याचे सामाजिक भान दिले,” अशी भावना खुद्द मधुभाईंनी व्यक्त केली असून, म्हणूनच त्यांनी या वयातही रत्नागिरीतच हा सोहळा व्हावा, अशी इच्छा व्यक्त केली आहे. हा कार्यक्रम केवळ सत्कारापुरता मर्यादित न राहता साहित्याचा दीपोत्सव ठरावा, अशी संकल्पना पालकमंत्री उदय सामंत यांनी मांडली आहे.
या लक्षणीय साहित्यिक कार्यक्रमास अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष विश्वास पाटील, रत्नागिरी नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा शिल्पाताई सुर्वे, कोकण मराठी साहित्य परिषदेचे विश्वस्त आमदार संजय केळकर, विश्वस्त रेखाताई नार्वेकर, प्रा. एल. बी. पाटील, अनुप कर्णिक यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
कोकणच्या या सुपुत्राने केलेल्या कार्याचा सन्मान अनुभवण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यातील सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि साहित्यिक क्षेत्रातील अनेक संस्थांनी पुढाकार घेतला असून, त्यांच्या माध्यमातूनही कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रयत्न सुरू आहेत. रत्नागिरीकर मोठ्या संख्येने या सोहळ्याला उपस्थित राहणार असून, कोकण मराठी साहित्य परिषद अंतर्गत सातही जिल्ह्यांतील पदाधिकारी व सभासदही उपस्थित राहणार आहेत.
मागील अनेक दिवसांपासून नामदार उदय सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाची सुकाणू समिती तसेच कोकण मराठी साहित्य परिषदेचे पदाधिकारी व कार्यकर्ते तयारी करत आहेत. नमिता कीर, प्रदीप ढवळ, शिल्पाताई सुर्वे, प्रकाश दळवी, आबा पाटील, आनंद शेलार, अभिजित हेगशेट्ये, संतोष तावडे, चंद्रमोहन देसाई यांच्यासह अनेक कार्यकर्ते या आयोजनात सक्रिय आहेत.
हा सोहळा रत्नागिरीच्या सांस्कृतिक इतिहासात सुवर्ण अक्षरांनी नोंदला जाईल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला असून, जिल्ह्यातील रसिक, तरुण लेखक आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. या स्तुत्य साहित्यिक उपक्रमासाठी रत्नागिरी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी मनुज जिंदल, कोकण मराठी साहित्य परिषदेच्या केंद्रीय अध्यक्षा नमिता कीर, केंद्रीय कार्याध्यक्ष प्रा. डॉ. प्रदीप ढवळ आणि कवी केशवसुत स्मारकाचे अध्यक्ष गजानन पाटील यांनी उपस्थितीचे आवाहन केले आहे.
या पत्रकार परिषदेला युवाशक्तीचे अरुण मोर्ये, जयू भाटकर, जिल्हाध्यक्ष आनंद शेलार, डॉ. समिधा गोरे, विनायक हातखांबकर यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

