(संगमेश्वर / एजाज पटेल)
फुणगूस खाडीभागातील एका ग्रामपंचायतीच्या अजब पाणीपुरवठा योजनेची चर्चा सध्या संपूर्ण परिसरात रंगली आहे. सरकारी विहीर, सरकारी पंप आणि ग्रामपंचायतीची योजना असताना वीजपुरवठा मात्र एका खासगी व्यक्तीच्या मीटरवरून होत असल्याचे समोर आल्यानंतर आता नवाच प्रश्न उपस्थित झाला आहे. हा खासगी वीजमीटर नेमका कोणत्या प्रवर्गातील आहे? तो सामान्य घरगुती मीटर आहे की कृषी पंपासाठी मंजूर करण्यात आलेला शेतकरी मीटर?
या प्रश्नामुळे प्रकरणाला अधिक गंभीर वळण मिळाले आहे. कारण, जर सार्वजनिक पाणीपुरवठा योजनेसाठी घरगुती मीटरचा वापर होत असेल, तर तो थेट वीज नियमांचे उल्लंघन मानला जाऊ शकतो. दुसरीकडे, जर कृषी पंपासाठी देण्यात आलेल्या शेतकरी मीटरवरून ही योजना चालवली जात असेल, तर शासनाच्या सवलतीच्या विजेचा गैरवापर झाल्याचा ठपका ग्रामपंचायतीवर येऊ शकतो. दोन्ही परिस्थितींमध्ये महावितरणच्या नियमांना आणि महसुलाला फटका बसल्याचे स्पष्ट होत आहे.
या प्रकाराचे बिंग काही दिवसांपूर्वी फुटल्यानंतर संबंधित ग्रामपंचायतीत एकच खळबळ उडाली. मात्र, त्यानंतरही जबाबदारांकडून ठोस हालचाल झालेली दिसली नाही. उलट, ज्या वाडीमध्ये हा प्रकार सुरू आहे ती वाडी गावाच्या टोकाला आणि दुर्गम भागात असल्याने “महावितरणचे अधिकारी इतक्या लांब येणारच नाहीत” असा आत्मविश्वास काही कारभाऱ्यांमध्ये असल्याची चर्चा ग्रामस्थांमध्ये सुरू आहे.
सामान्य ग्राहकाचे वीजबिल थकले की तत्काळ कारवाई करणारे महावितरण गेल्या दीड-दोन वर्षांपासून या प्रकाराबाबत अनभिज्ञ कसे राहिले, हाही प्रश्न उपस्थित होत आहे. दुर्गम भागाचा आडोसा घेत हा प्रकार इतका काळ सुरू राहिला का, याबाबतही आता संशय व्यक्त केला जात आहे.
सध्या त्या वाडीतील ग्रामस्थांची तहान एका खासगी मीटरच्या भरोशावर भागवली जात आहे. मात्र, उद्या संबंधित मीटरधारकाने वीजपुरवठा बंद केला किंवा काही तांत्रिक अडचण निर्माण झाली, तर भर उन्हाळ्यात संपूर्ण वाडीला पाण्यासाठी भटकंती करावी लागू शकते.
आता महावितरण आणि वरिष्ठ प्रशासन या दुर्गम वाडीपर्यंत पोहोचून संबंधित मीटरचे वास्तव तपासणार का? तसेच, हा मीटर ‘घरगुती’ आहे की ‘शेतकरी’, याचा उलगडा करून संबंधितांवर कारवाई होणार का? याकडे संपूर्ण खाडीभागातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

