( रत्नागिरी )
रत्नागिरी येथील आयुर्वेदतज्ज्ञ वैद्य निकिता जे. कोळी यांना विश्वगुरु संवाद संस्थेच्या वतीने, १० आणि ११ जानेवारी २०२६ रोजी छत्रपती संभाजीनगर, महाराष्ट्र येथे आयोजित राष्ट्रीय चर्चासत्रात “आयुर्वेद महिला नेतृत्व आयकॉन पुरस्कार २०२६” ने सन्मानित करण्यात आले. आयुर्वेद क्षेत्रातील नेतृत्व, शिक्षण, चिकित्सक सेवा व जागतिक पातळीवरील योगदानाबद्दल त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. हा पुरस्कार अग्निकर्म तज्ज्ञ वैद्य चंद्रकुमार देशमुख यांच्या हस्ते प्रदान करून गौरविण्यात आले.
वैद्य निकिता कोळी या कन्सल्टंट आयुर्वेदिक फिजिशियन व गर्भसंस्कार तज्ज्ञ असून, आयुर्वेद केवळ उपचारपद्धती न राहता जीवनशैली म्हणून जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्या सातत्याने कार्यरत आहेत. प्री-कन्सेप्शन केअर, गर्भसंस्कार, गर्भिणी परिचर्या, सूतिका परिचर्या, बाळ संस्कार, आयुर्वेदिक कॉस्मेटोलॉजी, होलिस्टिक हेल्थ व वेलनेस या विषयांत त्यांचे विशेष कार्य उल्लेखनीय आहे.
त्यांनी के.एल.ई विद्यापीठ, बेळगाव, कर्नाटक येथून बॅचलर्स ऑफ आयुर्वेद मेडिसिन एंड सर्जरी पदवी प्राप्त केली असून सध्या अळवास आयुर्वेदा मेडिकल विद्यापीठ, मंगळूर कर्नाटक येथे एम .डी. (स्वस्थवृत्त आणि योगा) पदव्युत्तर शिक्षण घेत आहेत. पदवी शिक्षणादरम्यान शैक्षणिक उत्कृष्टतेसाठी त्यांना हिमालया वेलनेस तर्फे “आयुर्वेद विशारदा पुरस्कार” ने सन्मानित करण्यात आले होते.
वैद्यकीय सेवेसोबतच त्या अध्यापन व मार्गदर्शन क्षेत्रातही सक्रिय असून, विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय आयुर्वेद व वेलनेस अकॅडमींसोबत त्यांनी सहकार्य केले आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर ऑनलाईन कन्सल्टेशनद्वारे विविध देशांतील रुग्णांना सेवा देत असून, त्यांच्या उपचारांना समाधानकारक प्रतिसाद मिळत आहे. त्यांच्या अध्यापनाच्या भूमिका आणि जागतिक प्रशिक्षण सत्रांनी भारत, युरोप आणि त्यापलीकडे हजारो विद्यार्थी आणि आयुर्वेदाच्या साधकांना प्रेरणा दिली आहे. आयुर्वेद विद्यार्थी व नवोदित चिकित्सकांसाठी त्या संरचित मेंटॉरशिप कार्यक्रमही राबवतात.
बॅचलर्स ऑफ आयुर्वेद मेडिसिन एंड सर्जरी अभ्यास मार्गदर्शन, एम.डी. पदव्युत्तर शिक्षण नियोजन, तसेच प्रॉडक्ट डेव्हलपमेंट व कंटेंट क्रिएशनसारख्या विषयांमध्ये त्या सोप्या व कृतीशील पद्धतीने मार्गदर्शन करतात. “आयुर्वेद ही केवळ चिकित्सा पद्धती नसून जाणीवपूर्वक जगण्याची कला आहे,” असा त्यांचा ठाम विश्वास असून, आयुर्वेदाच्या शाश्वत ज्ञानातून आरोग्यप्रवास घडवणे हेच त्यांचे ध्येय आहे. या उल्लेखनीय कार्याची दखल घेत विश्वगुरु संवाद तर्फे हा मानाचा पुरस्कार त्यांना सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला.

