( राजापूर / तुषार पाचलकर )
ऑल इंडिया ऑर्गनायझेशन ऑफ केमिस्ट अँड ड्रगिस्ट (AIOCD) यांच्या देशव्यापी बंदच्या हाकेला राजापूर तालुक्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. राजापूर तालुका केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनच्या नेतृत्वाखाली आज (बुधवारी, दि. २० मे २०२६) रोजी शहरासह ग्रामीण भागातील सर्व मेडिकल दुकाने बंद ठेवण्यात आली. या बंदला तालुक्यात शंभर टक्के प्रतिसाद मिळाल्याचा दावा संघटनेकडून करण्यात आला.
ऑनलाईन औषध विक्री तात्काळ बंद करावी, कॉर्पोरेट कंपन्यांकडून ग्राहकांना दिल्या जाणाऱ्या अव्यवहार्य सवलतींवर नियंत्रण आणावे तसेच बनावट औषध विक्री रोखण्यासाठी कठोर उपाययोजना कराव्यात, या प्रमुख मागण्यांसाठी देशभरात हा बंद पुकारण्यात आला होता.
राजापूर तालुक्यातील औषध विक्रेत्यांनी एकजूट दाखवत आंदोलनात सक्रिय सहभाग नोंदविला. या बंदच्या माध्यमातून औषध विक्रेत्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात आला.
जिल्हा केमिस्ट अँड डिस्ट्रीब्युटर्स असोसिएशन रत्नागिरी तसेच महाराष्ट्र राज्य केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनच्या मार्गदर्शनाखाली हा बंद यशस्वी करण्यात आला. राजापूर तालुक्यातील तब्बल ६५ औषध विक्रेत्यांनी स्वयंस्फूर्तीने सहभाग घेतला.
या बंदमुळे राजापूर शहरासह नाटे, पाचल, जैतापूर, ओणी आणि अन्य ग्रामीण भागातील सर्व मेडिकल दुकाने दिवसभर बंद राहिली. परिणामी अनेक रुग्ण आणि नागरिकांची गैरसोय झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.
राजापूर तालुका केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष एजाज पन्हळेकर, सचिव प्रफुल्ल लांजेकर, खजिनदार आदिल चौगुले तसेच सर्व पदाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली हा बंद आयोजित करण्यात आला होता. आंदोलनात सहभागी झालेल्या सर्व मेडिकल व्यावसायिकांचे संघटनेतर्फे आभार मानण्यात आले.

