(रत्नागिरी /प्रतिनिधी)
सामाजिक बांधिलकी, तळागाळातील जनतेसाठी सातत्याने केलेले कार्य आणि मानवाधिकार चळवळीतील सक्रिय योगदान याची दखल घेत मानवाधिकार सुरक्षा व संरक्षण ऑर्गनायझेशन, दिल्ली या राष्ट्रीय स्तरावरील संस्थेने रत्नागिरी जिल्ह्याच्या “समाज कल्याण संपर्क सचिव” पदाची धुरा सामाजिक कार्यकर्ते मनोहर गुरव यांच्याकडे सोपवली आहे. त्यांच्या या निवडीमुळे जिल्ह्यातील सामाजिक, शैक्षणिक आणि मानवाधिकार क्षेत्राला नवे बळ मिळणार असल्याची भावना विविध स्तरांतून व्यक्त होत आहे.
मानवी हक्कांचे संरक्षण, वंचित आणि दुर्बल घटकांना न्याय मिळवून देणे, तसेच शासनाच्या कल्याणकारी योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी मनोहर गुरव यांनी गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने काम केले आहे. सामाजिक, क्रीडा, सांस्कृतिक आणि शैक्षणिक क्षेत्रातही त्यांची सक्रिय भूमिका राहिली असून, माहितीचा अधिकार कार्यकर्ता फेडरेशन महाराष्ट्र राज्याच्या रत्नागिरी जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारीही ते प्रभावीपणे सांभाळत आहेत. मानवाधिकार सुरक्षा व संरक्षण ऑर्गनायझेशनच्या माध्यमातून जिल्ह्यात मानवाधिकार जनजागृती अभियान अधिक व्यापक स्वरूपात राबविण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला आहे. महिला, बालक, दिव्यांग आणि सामाजिकदृष्ट्या उपेक्षित घटकांच्या हक्कांच्या संरक्षणासाठी संघटनेच्या माध्यमातून प्रभावी उपक्रम राबविणार असल्याचे त्यांनी सांगितले.
नियुक्तीनंतर प्रतिक्रिया देताना मनोहर गुरव म्हणाले, “मानवाधिकारांचे संरक्षण करणे आणि वंचितांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणे हेच माझे सर्वोच्च कर्तव्य असेल. समाजातील शेवटच्या घटकापर्यंत न्याय आणि शासनाच्या योजना पोहोचविण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले जातील.” दरम्यान, त्यांच्या या निवडीबद्दल सामाजिक कार्यकर्ते, माहिती अधिकार चळवळीतील पदाधिकारी, विविध संघटनांचे प्रतिनिधी तसेच हितचिंतकांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. रत्नागिरी जिल्ह्यात मानवाधिकार विषयक चळवळीला यामुळे अधिक गती मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

