(रत्नागिरी)
मिरजोळे एमआयडीसी परिसरात वेल्डिंगचे काम करत असताना उंचावरून पडलेल्या एका तरुण कामगाराला हायव्होल्टेज वीज वाहिनीचा धक्का लागून गंभीर दुखापत झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. रोशन घवाळी असे जखमी कामगाराचे नाव असून त्याच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, मिरजोळे एमआयडीसी परिसरातील प्लॉट क्रमांक P-24 येथे घरमालक अब्दुल रहमान अन्सारी यांच्या जागेत पत्रे बसविण्याचे आणि वेल्डिंगचे काम सुरू होते. यावेळी रोशन घवाळी हा कामगार उंचावर चढून काम करत असताना अचानक त्याचा तोल गेला आणि तो खाली कोसळला.
घटनास्थळालगत एफसीआय गोदामाच्या भिंतीपलीकडे महावितरणची हायव्होल्टेज एक्स्टेंशन वीज वाहिनी गेली आहे. खाली पडताना रोशनचा या वीज वाहिनीला स्पर्श झाल्याने त्याला जोरदार विजेचा धक्का बसला. या धक्क्यामुळे त्याची पाठ गंभीररित्या भाजली. त्यानंतर तो खाली पडताना कंपाऊंडच्या सुरक्षेसाठी लावलेल्या काटेरी तारांच्या कुंपणात अडकला. या अपघातात त्याच्या पायालाही गंभीर दुखापत झाली. दुहेरी अपघातामुळे रोशन अत्यंत गंभीर अवस्थेत घटनास्थळी अडकून पडला होता.
घटनेची माहिती मिळताच मिरजोळे एमआयडीसी अग्निशमन दलाचे जवान तातडीने घटनास्थळी दाखल झाले. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून जवानांनी कटरच्या सहाय्याने सुरक्षा तारा कापून रोशनची सुटका केली.
अग्निशमन दलाने अवघ्या दहा मिनिटांत जखमी कामगाराला रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. सध्या डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
या धाडसी बचावकार्यात अग्निशमन दलाचे आनंद राऊत, दिलीप दळवी, हर्षल आकडे, प्रमोद राठोड, यतीराज मोरे, ओम यादव, शुभम गायकवाड आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मोलाची भूमिका बजावली. अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे जखमी तरुणाला वेळेत वैद्यकीय मदत मिळाल्याने परिसरातून जवानांवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

