(राजापूर / वार्ताहर)
राजापूर तालुक्यातील कोतापूर या छोट्या पण कलावंतांनी समृद्ध गावाने आपल्या कुशल कारागिरातील एक हिरा गमावला आहे. पारंपरिक सुतारकाम आणि लोहारकाम या दोन्ही क्षेत्रांत नावलौकिक मिळवलेले पुरुषोत्तम बाळकृष्ण सुतार (वय ६१) यांचे अल्पशा आजाराने ९ ऑक्टोबर रोजी दुःखद निधन झाले.
गेल्या सात-आठ महिन्यांपासून ते आजारी होते. उपचार सुरू असताना त्यांना प्रकृतीने साथ दिली नाही आणि लांजा येथे उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या जाण्याने राजापूर तालुक्यासह परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
सुतार आणि लोहारकामाची दुहेरी कला अंगी बाळगणारे पुरुषोत्तम सुतार हे अत्यंत दुर्मिळ प्रकारचे कलाकार होते. फर्निचरवरील नक्षीकाम, सूक्ष्म कलाकुसर तसेच लोखंडातील सुंदर कलाकृतींमुळे त्यांनी स्थानिकच नव्हे तर मुंबई–पुण्यासारख्या ठिकाणीही आपली ओळख निर्माण केली होती.
त्यांच्या कुशल हातून तयार झालेली हत्यारे, अवजारे आणि शोभेच्या वस्तूंना तालुकाभरात मागणी होती. त्यांच्या कार्यामुळे कोतापूर गाव ‘कलावंतांचे गाव’ म्हणूनही ओळखले जाऊ लागले होते.
पुरुषोत्तम सुतार हे प्रेमळ स्वभावाचे, मदतशील आणि जमिनीवर राहणारे व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जात. त्यांच्या निधनाने तालुक्यातील कलावंत समाजाने एक मार्गदर्शक व्यक्ती गमावली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, भाऊ, दोन मुलगे आणि एक मुलगी असा मोठा परिवार आहे. त्यांच्या निधनाने संपूर्ण राजापूर तालुक्यात शोककळा पसरली आहे.

