(जैतापूर / वार्ताहर)
दळे येथे जय निरंकारी क्रिकेट यंग स्टार दळे यांच्या वतीने आयोजित ओव्हरम क्रिकेट स्पर्धा २८ व २९ मार्च रोजी उत्साहात पार पडली. या स्पर्धेत १६ संघांनी सहभाग घेतला असून दोन दिवस प्रेक्षकांना थरारक व दर्जेदार सामने अनुभवायला मिळाले.
स्पर्धेचे उद्घाटन सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ (सागरी पोलीस ठाणे, नाटे), राजापूर तालुका पत्रकार संघाचे उपाध्यक्ष राजन लाड, संदीप शिवलकर, राजेंद्र प्रसाद राऊत, उदय गिरकर, संतोष लासे, अरविंद लासे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत झाले.
अंतिम सामना देवगड तालुक्यातील पडेल येथील पुष्पराम स्पोर्ट्स आणि भालावली येथील जेसीसी संघ यांच्यात रंगला. या सामन्यात पडेल संघाने सुरुवातीपासून आक्रमक खेळ करत भालावली संघावर एकतर्फी विजय मिळवून विजेतेपद पटकावले. भालावली जेसीसी संघाने चांगली झुंज देत उपविजेतेपद मिळवले. तृतीय क्रमांक महापुरुष नाटे संघाने मिळवला, तर एमबी स्पोर्ट्स कातळी संघाने चतुर्थ स्थान पटकावले.
स्पर्धेतील प्रथम क्रमांकासाठी जब्बार काझी यांनी १५ हजार रुपयांचे बक्षीस दिले. द्वितीय क्रमांकासाठी १० हजार रुपये सौरभ मयेकर, तृतीय क्रमांकासाठी ३ हजार रुपये संजय शिवलकर, तर चतुर्थ क्रमांकासाठी २ हजार रुपये संदीप शिवलकर यांनी दिले. विजेत्या संघांना भव्य ट्रॉफी कैलासवासी सौ. नयना नारायण तांबे यांच्या स्मरणार्थ नितेश नारायण तांबे यांनी प्रदान केल्या. तसेच वैयक्तिक पुरस्कार कैलासवासी सुनंदा सदानंद मंगेशकर यांच्या स्मरणार्थ सुजन सदानंद पंगेरकर यांनी दिले.
वैयक्तिक कामगिरीत भालावली जेसीसी संघाच्या निवृत्ती भोसले यांना मालिकावीराचा मान मिळाला. महापुरुष नाटे संघाच्या प्रसाद आरेकर यांना उत्कृष्ट विकेटकीपर, पडेल संघाच्या अतुल यांना उत्कृष्ट फलंदाज, तर सुरज यांना उत्कृष्ट गोलंदाज म्हणून गौरविण्यात आले.
बक्षीस वितरण समारंभासाठी जब्बार काझी, राजेंद्र प्रसाद राऊत, वैभव कुवेस्कर, राकेश दांडेकर, अरविंद लासे, राजन लाड, उदय गिरकर, संतोष लासे आदी मान्यवर उपस्थित होते.
स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी मिलिंद गिरकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. पंकज पांचाळ व त्यांच्या सहकाऱ्यांनी समालोचन व सूत्रसंचालन प्रभावीपणे पार पाडले. दळे व परिसरातील क्रिकेटप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या स्पर्धेमुळे परिसरात क्रीडामय वातावरण निर्माण झाले असून युवा खेळाडूंना आपली गुणवत्ता दाखवण्याची उत्तम संधी मिळाली.

