(पुणे)
पुण्यातील सिंहगड रोड परिसरातील निम्बजनगर येथे हृदयद्रावक घटना घडली असून, लिफ्टमध्ये अडकल्याने ७ वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून, सोसायटीतील लिफ्ट सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, निम्बजनगरमधील ‘रिद्धी-सिद्धी अपार्टमेंट’मध्ये राहणारा शिवांश शैलेश धूत (वय ७) हा सोमवारी रात्री साडेदहाच्या सुमारास इमारतीत खेळत होता. खेळता खेळता तो लिफ्टमध्ये गेला. लिफ्टमधील बटणे दाबल्यानंतर लिफ्ट सुरू झाली. मात्र, दुसऱ्या मजल्यापर्यंत पोहोचण्यापूर्वीच लिफ्ट अचानक अडकली. यावेळी शिवांश हा लिफ्टच्या दोन्ही दरवाज्यांच्यामध्ये अडकल्याने गंभीर जखमी झाला.
बराच वेळ मुलगा दिसत नसल्याने सोसायटीतील रहिवाशांनी शोध घेतला असता ही धक्कादायक बाब समोर आली. तत्काळ पोलिसांना आणि अग्निशमन दलाला माहिती देण्यात आली. घटनास्थळी दाखल झालेल्या अग्निशमन दलाच्या जवानांनी मोठ्या प्रयत्नांनंतर शिवांशला बाहेर काढले. मात्र, तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता.
प्राथमिक तपासात लिफ्टमध्ये कोणताही मोठा तांत्रिक बिघाड आढळून आलेला नसल्याची माहिती समोर आली आहे. संबंधित लिफ्टची देखभाल सोसायटीमार्फत केली जात असल्याचेही स्पष्ट झाले आहे. या प्रकरणी सिंहगड रोड पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनय पाटणकर यांनी दिली.
या दुर्दैवी घटनेनंतर निवासी संकुलांमधील लिफ्ट सुरक्षेचे नियम, नियमित देखभाल आणि बालसुरक्षेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.

