(ठाणे)
कल्याणमधील खडकपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आलेल्या धक्कादायक हत्याकांडाने परिसरात खळबळ उडाली आहे. अनैतिक संबंधातून निर्माण झालेल्या वादातून दिरानेच आपल्या वहिनीची निर्घृण हत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी आरोपीला झारखंडमधून नाट्यमय कारवाई करत अटक केली असून, तो नेपाळमध्ये पळून जाण्याच्या तयारीत असल्याची माहिती तपासात उघड झाली आहे.
मृत महिलेचे नाव गुड्डू देवी असे असून, हत्या करणाऱ्या आरोपी दिराचे नाव बम बम कुमार आहे. या प्रकरणाची सुरुवात २७ एप्रिल रोजी झाली होती. कल्याण पश्चिमेकडील घरात गुड्डू देवी गंभीर जखमी अवस्थेत आढळून आल्या होत्या. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचार सुरू असतानाच ११ मे रोजी त्यांचा मृत्यू झाला.
सुरुवातीला हा घरगुती अपघात असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत होता. मात्र खडकपाडा पोलिसांनी सखोल तपास सुरू केल्यानंतर धक्कादायक वास्तव समोर आले. पोलिसांच्या तपासानुसार, मृत गुड्डू देवी आणि त्यांचा दिर बम बम कुमार यांच्यात काही काळापासून अनैतिक संबंध होते. या संबंधांची माहिती दोन्ही कुटुंबांना होती. मृत महिलेला दोन मुले असून आरोपीलाही एक मुलगी आहे.
काही दिवसांपासून गुड्डू देवी यांनी आरोपीशी बोलणे बंद केले होते आणि संबंध तोडण्याचा प्रयत्न सुरू केला होता. याच गोष्टीचा आरोपीच्या मनात राग होता. २७ एप्रिल रोजी तो तिच्या घरी गेला आणि “माझ्याशी बोलणं का बंद केलं?” असा जाब विचारत दोघांमध्ये जोरदार वाद झाला. वादाचे रूपांतर हाणामारीत झाले आणि संतापाच्या भरात आरोपीने गुड्डू देवी यांचे डोके जोरात भिंतीवर आपटले. यात त्यांच्या मेंदूला गंभीर दुखापत झाली.
झारखंड ते नेपाळ; आरोपीचा थरारक पळून जाण्याचा प्लॅन
घटना घडल्यानंतर आरोपीने मोबाईल बंद करून फरार होण्याचा प्रयत्न केला. तांत्रिक पुरावे मिळत नसल्याने पोलिसांसमोर तपासाचे मोठे आव्हान उभे राहिले होते. मात्र नातेवाईकांकडून मिळालेल्या गोपनीय माहितीनंतर आरोपीच्या मूळ गावाचा सुगावा लागला. खडकपाडा पोलिसांचे विशेष पथक थेट झारखंड राज्यातील गोड्डा जिल्ह्यात दाखल झाले. स्थानिक पोलिसांच्या मदतीने आरोपीचा शोध सुरू असतानाच पोलिसांचे पथक आपल्या मागावर असल्याची माहिती आरोपीला मिळाली. त्यामुळे त्याने थेट नेपाळमध्ये पळून जाण्याचा प्लॅन आखला होता.
अवघ्या २० मिनिटांत पोलिसांची मोठी कारवाई
कल्याण पोलिसांनी वेगाने हालचाली करत सीमा भागातच आरोपी बम बम कुमारला अटक केली. पोलिसांच्या माहितीनुसार, केवळ २० मिनिटांचा उशीर झाला असता तर आरोपी नेपाळमध्ये प्रवेश करण्यात यशस्वी झाला असता आणि त्याला पकडणे अत्यंत कठीण झाले असते. आरोपीला झारखंडमधून कल्याणमध्ये आणण्यात आले असून न्यायालयाने त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास खडकपाडा पोलीस करत आहेत.

