(ठाणे)
कल्याण रेल्वे स्थानकावरून सोमवारी मध्यरात्री अपहरण झालेल्या आठ महिन्यांच्या बाळाचा शोध पोलिसांच्या सतर्कतेमुळे अवघ्या सहा तासांत लागला. महात्मा फुले चौक पोलिस ठाण्यातील हवालदार सतीश सोनवणे यांच्या चाणाक्षपणामुळे हे यश मिळाले असून, पोलिसांनी बाळाचे अपहरण करणाऱ्या आत्या आणि तिच्या पुतण्याला अटक केली आहे.
या प्रकरणात कल्याण लोहमार्ग पोलिस ठाण्यात दाखल तक्रारीच्या आधारे अपहरणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर आणि पोलिसांच्या व्हॉट्सअॅपवर प्रसारित करण्यात आला होता. त्याच व्हिडिओच्या आधारे सोनवणे यांनी आरोपीला ओळखून तपासाला निर्णायक वळण दिले.
सतर्कतेमुळे मिळाले यश
सोमवारी मध्यरात्री कल्याण रेल्वे स्थानक परिसरात मोलमजुरी करणारे निलेश आणि पूनम कुंचे हे दाम्पत्य त्यांच्या आठ महिन्यांच्या बाळासह झोपलेले असताना अज्ञात तरुणाने बाळ उचलून नेले. सकाळी जाग आल्यानंतर बाळ गायब असल्याचे लक्षात येताच पूनम यांनी हंबरडा फोडला. परिसरातील प्रवासी आणि स्थानक कर्मचारी यांच्या मदतीने दाम्पत्याने कल्याण लोहमार्ग पोलिस ठाण्यात तक्रार दिली.
पोलिसांनी लगेचच सीसीटीव्ही फुटेज तपासून बाळ चोरणारा तरुण ओळखला. महात्मा फुले पोलिस ठाण्यातील हवालदार सतीश सोनवणे यांनी तोच तरुण अक्षय खरे असल्याचे ओळखले. काही तासांपूर्वीच सोनवणे यांनी अक्षयला एका भांडण प्रकरणात समज दिली होती. व्हिडिओ पाहून सोनवणे यांच्या लक्षात आले की तोच तरुण अपहरणकर्ता आहे. सोनवणे यांनी तत्काळ वरिष्ठ पोलिस निरीक्षक बाळकृष्ण परदेशी यांना माहिती दिली. त्यानंतर दोन पथकं तयार करून बाळाचा शोध सुरू झाला.
घरावर छापा, बाळ सुरक्षित मिळाले
एका पथकाने अक्षयच्या घरावर छापा टाकला असता, तिथे तो आणि त्याची आत्या सविता खरे यांच्या ताब्यात अपहरण केलेले बाळ सापडले. पोलिसांनी दोघांना ताब्यात घेऊन बाळ आईच्या स्वाधीन केले. सहाय्यक पोलिस आयुक्त कल्याणजी घेटे यांनी सांगितले की, “सोनवणे यांच्या तत्परतेमुळे आणि पोलिसांच्या जलद कारवाईमुळे बाळ सुरक्षितपणे परत मिळाले. आरोपींनी अपहरणाचे कारण अद्याप स्पष्ट केले नाही, याप्रकरणी सखोल चौकशी सुरू आहे.”

