(सांगली)
सांगली जिल्ह्यातील ईश्वरपूर परिसरात एका खासगी कंपनीच्या सेप्टिक टँकमध्ये गुदमरून तिघा कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्याच वेळी अडकलेल्या कामगारांना वाचवण्यासाठी टँकमध्ये उतरलेल्या पाच जणांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे कामगारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
ईश्वरपूर येथील पेठ येईल गावाच्या हद्दीतील बॉम्बे रेयॉन कंपनीत रविवारी सायंकाळी सेप्टिक टँक स्वच्छ करण्याचे काम सुरू होते. कामासाठी टँकमध्ये उतरलेल्या तिघा कामगारांना ऑक्सिजनचा पुरवठा न झाल्याने ते गुदमरले. टँकमध्ये कार्बनडायऑक्साइड वायूचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाल्याने तिघांचा जागीच मृत्यू झाल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.
मृत कामगारांची नावे विशाल सुभाष जाधव (३५), सचिन तानाजी जाधव (३९, दोघे रा. बेघर वसाहत, ईश्वरपूर) आणि सागर रंगराव माळी (३३, रा. गोळेवाडी-पेठ) अशी आहेत. त्यांना वाचवण्यासाठी गेलेल्या पाच जणांची प्रकृती बिघडली असून त्यांच्यावर शहरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यातील महादेव रामचंद्र कदम (४६) याला अधिक उपचारासाठी कोल्हापूर येथे हलवण्यात आले आहे. अन्य जखमींमध्ये सुनील आनंदा पवार (२९, रा. रेठरेधरण), केशव आनंदा साळुंखे (४५, रा. निगडी, ता. शिराळा), हेमंत शंकर धनवडे (२७, रा. ओझर्डे) आणि विशाल मारुती चौगुले (२९, रा. ईश्वरपूर) यांचा समावेश आहे.
घटनेची माहिती मिळताच ईश्वरपूर पोलीस ठाण्याचे निरीक्षक सोमनाथ वाघ यांच्यासह पोलीस कर्मचारी रुग्णालयात दाखल झाले होते. जखमींची व संबंधितांचे जबाब नोंदवण्यात आले असून गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.

