(रत्नागिरी / प्रतिनिधी)
शहरातील गणेश कॉलनी परिसरात राहणाऱ्या एका वृद्धाचा झोपेतच मृत्यू झाल्याची घटना रविवारी पहाटे उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. सुहास श्रीनिवास मुकादम (वय ७९, मूळ रा. ब्रम्हणवाडी राई, ता. जि. रत्नागिरी; सध्या रा. साई कॉम्प्लेक्स, गणेश कॉलनी, टी.आर.पी., रत्नागिरी) असे मृत वृद्धाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी पहाटे त्यांना उठवण्यासाठी हाक मारण्यात आली. मात्र, त्यांच्या शरीरात कोणतीही हालचाल होत नसल्याचे निदर्शनास आले. यानंतर निशिगंधा निलेश साने यांनी तातडीने नातेवाईकांना याबाबत माहिती दिली. नातेवाईक घटनास्थळी दाखल झाल्यानंतर सुहास मुकादम यांना उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. या प्रकरणी रत्नागिरी शहर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील कार्यवाही सुरू आहे.

