(दापोली)
रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील आंजर्ले गावचा सुपुत्र निनाद सुभाष जोशी यांची स्टेट रिझर्व्ह पोलिस फोर्स (एसआरपीएफ) मध्ये यशस्वी निवड झाली असून त्यांच्या या उल्लेखनीय यशामुळे आंजर्लेसह संपूर्ण दापोली तालुक्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
निनाद जोशी यांचा शपथविधी समारंभ दौंड येथील नांदविज प्रशिक्षण केंद्रात उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. कठोर परिश्रम, जिद्द आणि सातत्यपूर्ण मेहनतीच्या जोरावर त्यांनी हे यश संपादन केले आहे. त्यांच्या या यशामुळे युवकांमध्ये प्रेरणादायी वातावरण निर्माण झाले असून विविध स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
लहानपणापासूनच शिस्तबद्ध जीवनशैली आणि देशसेवेची आवड असलेल्या निनाद यांनी स्पर्धात्मक परीक्षांची तयारी करताना मोठी मेहनत घेतली. अखेर त्यांच्या चिकाटीला यश मिळाले आणि त्यांची एसआरपीएफमध्ये निवड निश्चित झाली.
निनाद यांच्या यशाबद्दल त्यांच्या कुटुंबीयांनी आनंद व्यक्त केला असून मित्रपरिवार, ग्रामस्थ आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे. भविष्यात त्यांनी प्रामाणिकपणे आणि निष्ठेने सेवा बजावत गाव, तालुका आणि जिल्ह्याचे नाव अधिक उज्ज्वल करावे, अशा शुभेच्छाही व्यक्त करण्यात येत आहेत.
दरम्यान, ग्रामीण भागातील युवकांनीही जिद्द आणि मेहनतीच्या बळावर शासकीय सेवेत यश मिळवू शकते, हे निनाद जोशी यांनी आपल्या यशातून दाखवून दिल्याची भावना आंजर्ले ग्रामस्थांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

