(रत्नागिरी)
कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या आरोग्य संवर्धनाच्या दृष्टीने महावितरणच्या येथील कार्यालयात इन्फिगो आय केअर हॉस्पिटल, रत्नागिरी यांच्या सौजन्याने मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते.
शिबिरादरम्यान उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांची शास्त्रीय पद्धतीने नेत्र तपासणी करण्यात आली. डोळ्यांचे आजार, दृष्टीदोष, चष्म्याची गरज तसेच डोळ्यांच्या आरोग्याची काळजी कशी घ्यावी याबाबत तज्ज्ञ डॉक्टरांनी सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच आवश्यक त्या कर्मचाऱ्यांना पुढील उपचारांसाठी मार्गदर्शन करण्यात आले.
या नेत्र तपासणी शिबिरामध्ये सहाय्यक महाव्यवस्थापक (मानव संसाधन) अजय निकम, कार्यकारी अभियंता जितेंद्र फुलपगारे, व्यवस्थापक (मानव संसाधन) श्रावणी कांबळे तसेच इन्फिगो आय केअर हॉस्पिटलचे तज्ज्ञ डॉक्टर व त्यांची अनुभवी वैद्यकीय टीम उपस्थित होती. या उपक्रमाचा महावितरणच्या १०० हून अधिक अधिकारी व कर्मचारी यांनी लाभ घेतला.

