(रत्नागिरी / वार्ताहर)
आपल्या दर्जेदार आणि कल्पक कलाकृतींनी स्वतंत्र ओळख निर्माण करणारे रत्नागिरीचे लेखक-दिग्दर्शक शशिकांत गुरव यांच्या ‘SYNC’ या नव्या लघुपटाने जागतिक स्तरावर मोठी कामगिरी बजावली आहे. या लघुपटाची रोमानिया (युरोप) येथील प्रतिष्ठित ‘ओपन फ्रेम गालाटी २०२६’ (Open Frame Galați) या आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सवासाठी अधिकृत निवड (Official Selection) झाली आहे. पहिल्याच प्रयत्नात थेट युरोपमधील महोत्सवात मिळालेल्या या जागतिक पावतीमुळे रत्नागिरीच्या कलाविश्वात आनंदाचे वातावरण आहे.
गेल्या ६ ते ७ वर्षांपासून चित्रपटसृष्टीत सहाय्यक दिग्दर्शक म्हणून कार्यरत असणाऱ्या शशिकांत गुरव यांचा दांडगा अनुभव या लघुपटाच्या निमित्ताने पाहायला मिळत आहे. यापूर्वी अनेक प्रायोगिक आणि व्यावसायिक प्रकल्पांवर काम केल्यानंतर, त्यांनी ‘सोशल स्टोरी स्टुडिओ’च्या बॅनरखाली ‘SYNC’ च्या माध्यमातून आपली एक स्वतंत्र आणि वेगळी दिग्दर्शकीय शैली आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर मांडली आहे.
एकही संवाद नसलेला ‘टेक्नो हॉरर’ लघुपट
या लघुपटाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे हा पूर्णपणे संवादरहित (Silent Short Film) आहे. कोणताही संवाद नसताना केवळ अभिनय, पार्श्वसंगीत आणि तांत्रिक कौशल्याच्या जोरावर थरार मांडण्याचे धाडस दिग्दर्शकाने केले आहे. ‘SYNC’ हा तांत्रिकदृष्ट्या प्रगत असून हा चित्रपट ‘टेक्नो हॉरर’ (Techno Horror) या जॉनरवर आधारित आहे. यात अभिनेता अजिंक्य केसरकर यांनी अत्यंत प्रभावी मुख्य भूमिका साकारली आहे, तर स्वाती तोडणकर यांनी या लघुपटाची निर्मिती केली आहे.
जागतिक स्तरावर चुरस; ‘लॉरेल’ दिमाखात सादर
महोत्सवाकडून अधिकृत निवड झाल्याचे ‘लॉरेल’ (Official Laurel) नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. या महोत्सवाचा मुख्य इव्हेंट आगामी २३ मे २०२६ रोजी रोमानियात पार पडणार आहे. याशिवाय ‘गार्डुनहा फेस्ट’ आणि ‘कलाकारी फिल्म फेस्ट’ यांसारख्या इतरही मोठ्या जागतिक लघुपट महोत्सवांच्या शर्यतीत ‘SYNC’ सामील असून तिथेही चित्रपट परीक्षणाधीन टप्प्यात आहे.
“Connected. Controlled. Terrified.” अशी टॅगलाईन असलेल्या या सायलेंट टेक्नो-हॉरर चित्रपटाला सोनाली केसरकर आणि संतोष गोरीवले यांचे विशेष आभार लाभले आहेत. सध्या या लघुपटाकडून आंतरराष्ट्रीय स्तरावर चांगल्या कामगिरीची अपेक्षा व्यक्त केली जात असून, महोत्सवातील ज्युरी आणि सिनेसमीक्षकांचे लक्ष या कलाकृतीकडे वेधले गेले आहे.

