(रत्नागिरी / वार्ताहर)
रत्नागिरीच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचे जतन आणि संवर्धन करण्यात गोगटे-जोगळेकर (स्वायत्त) महाविद्यालयाचे नेहमीच महत्त्वपूर्ण योगदान राहिले आहे. महाविद्यालयातून आजवर अनेक कलाकार घडले असून, ते मराठी रंगभूमी, मालिका आणि चित्रपट क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत रत्नागिरीचे नाव उज्ज्वल करीत आहेत.
विद्यार्थ्यांमधील अंगभूत कलागुणांना व्यासपीठ मिळावे आणि त्यांना अभिनय, रंगभूमी व सादरीकरण कलेचे शास्त्रशुद्ध ज्ञान मिळावे, या उद्देशाने दोन वर्षांपूर्वी महाविद्यालयात ‘परफॉर्मिंग आर्ट्स’ शाखेची सुरुवात करण्यात आली. शाखेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्याबरोबरच विविध कार्यशाळा, उपक्रम आणि प्रशिक्षणाच्या माध्यमातून त्यांच्या कलाविषयक कौशल्यांना समृद्ध करण्याचे काम सुरू आहे.
या शाखेचा द्वितीय वर्धापनदिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. वर्धापनदिनानिमित्त रत्नागिरीतील ज्येष्ठ तसेच युवा रंगकर्मी आणि विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी शाखेला भेट देत विद्यार्थ्यांच्या कलाविष्काराचे आणि शाखेच्या उपक्रमांचे कौतुक केले.
यावेळी ज्येष्ठ रंगकर्मी मनोहर जोशी, अनुया बाम, सोनाली सावंत, विजय पोकळे, तसेच युवा रंगकर्मी दीपक माणगावकर आणि अजिंक्य केसरकर यांनी शाखेला भेट देऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी कलाक्षेत्रात सातत्याने नवनवीन प्रयोग करावेत आणि आपल्या कलागुणांना योग्य दिशा द्यावी, अशा शुभेच्छा मान्यवरांनी दिल्या.
महाविद्यालयाचे ज्येष्ठ लिपिक नंदकिशोर गोळपकर, माजी सहकारी बापू गवाणकर, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. सुनील गोसावी, क्रीडा विभागप्रमुख डॉ. विनोद शिंदे, लीना सावंत, राजेश मालप, डॉ. यास्मिन आवटे आदींनीही उपस्थित राहून विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीचे कार्यवाह सतीश शेवडे, सहकार्यवाह प्रा. श्रीकांत दुदगीकर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर, उपप्राचार्य डॉ. सीमा कदम आणि समन्वयक डॉ. मीनल खांडके यांनी शाखेच्या वाटचालीचे कौतुक करत विद्यार्थ्यांना पुढील कलाप्रवासासाठी शुभेच्छा दिल्या.
तसेच रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या कार्याध्यक्षा श्रीमती शिल्पाताई पटवर्धन, कार्यवाह सतीश शेवडे, सहकार्यवाह प्रा. श्रीकांत दुदगीकर, प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर, प्रशासकीय उपप्राचार्य डॉ. सुरेंद्र ठाकूरदेसाई, उपप्राचार्य डॉ. अपर्णा कुलकर्णी, डॉ. कल्पना आठल्ये, डॉ. सीमा कदम, समन्वयक डॉ. मीनल खांडके, विभागप्रमुख डॉ. आनंद आंबेकर तसेच सर्व प्राध्यापकांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
परफॉर्मिंग आर्ट्स शाखेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना केवळ कलाविष्काराचे व्यासपीठ न देता त्यांना व्यावसायिक कलाक्षेत्रासाठी आवश्यक कौशल्ये आणि आत्मविश्वास देण्याचा प्रयत्न सुरू आहे. शाखेच्या द्वितीय वर्धापनदिनानिमित्त मिळालेल्या मान्यवरांच्या शुभेच्छांमुळे विद्यार्थ्यांमध्ये नव्या उत्साहाची आणि आत्मविश्वासाची भावना निर्माण झाली.

