(खेड)
रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील लोटे-परशुराम औद्योगिक वसाहतीत एका १९ वर्षीय युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना दुर्गा ऑर्गेनिक्स कंपनीच्या परिसरात घडली असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
नितीनकुमार प्रमोद सिंग (वय १९, रा. कमोरिया हाथी बाजार, तेदुई, वाराणसी, उत्तर प्रदेश) असे मृत युवकाचे नाव आहे. ही घटना १६ मे रोजी रात्री १० वाजल्यापासून ते १७ मे २०२६ रोजी सकाळी ७ वाजेच्या दरम्यान घडल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.
मयत नितीनकुमार काही वेळापासून दिसून येत नसल्याने त्याचा नातेवाईक सुख्खु लालताप्रसाद सिंग यांनी परिसरात शोधाशोध सुरू केली. त्यावेळी परशुराम येथील दुर्गा ऑर्गेनिक्स कंपनीच्या बॉयलर शेडमध्ये छतावरील लोखंडी पाईपाला गमछाच्या सहाय्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत तो आढळून आला.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करून मृतदेह खाली उतरविण्यात आला आणि पुढील तपासासाठी कळंबणी ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आला. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर नितीनकुमार प्रमोद सिंग यास मृत घोषित केले.
या प्रकरणी पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलीस अधिक तपास करीत आहेत.

