(रत्नागिरी / प्रतिनिधी)
जांभारी परिसर मंगळवारी सकाळी झालेल्या भीषण स्फोटाने अक्षरशः हादरून गेला. वाटद पोलीस चौकी हद्दीतील जांभारी फाटा येथे लाकडे गोळा करण्यासाठी गेलेल्या एका महिलेच्या हातात गावठी बॉम्बचा स्फोट झाल्याची धक्कादायक घटना घडली. या स्फोटात महिलेचा हात गंभीर जखमी झाला असून परिसरातून तब्बल २० ते २५ जिवंत गावठी बॉम्ब आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे.
रेश्मा प्रमोद सुर्वे (वय ४५, रा. जांभारी फाटा) या मंगळवारी सकाळी साडेसातच्या सुमारास जंगल परिसरात लाकडे आणण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी त्यांना संशयास्पद वस्तू दिसल्याने त्यांनी ती हातात उचलली. मात्र क्षणार्धात जोरदार स्फोट झाला. स्फोट इतका भीषण होता की त्यांच्या डाव्या हाताची बोटे तुटली असून त्या गंभीर भाजल्या आहेत. स्फोटाचा आवाज दूरवर ऐकू गेल्याने परिसरात घबराट पसरली. रक्तबंबाळ अवस्थेत असलेल्या रेश्मा सुर्वे यांना तातडीने रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारांसाठी त्यांना मुंबई येथे हलविण्यात आल्याची माहिती मिळाली.
घटनेची माहिती मिळताच जयगड पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत परिसराची पाहणी केली. यावेळी परिसरात आणखी २० ते २५ जिवंत गावठी बॉम्ब आढळून आल्याने पोलिसही सतर्क झाले. एवढ्या मोठ्या प्रमाणावर स्फोटके नेमकी कुणी आणि कोणत्या उद्देशाने ठेवली होती, याबाबत आता गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. दरम्यान, संपूर्ण परिसर पोलिसांनी सील केला असून बॉम्ब शोध पथक, श्वानपथक आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून जांभारी परिसरात भीती आणि चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

