(खेड)
खेड तालुक्यात सोमवारी संध्याकाळी अत्यंत हृदयद्रावक घटना घडली. धामणंद गावातील काजू फाटा परिसरातील नागझरी नदीत बुडून तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या दुर्घटनेत एका १५ वर्षीय मुलीसह गुहागर येथील दोघांचा मृत्यू झाल्याने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.
मृतांमध्ये लावण्या विजय पार्टे (वय १५, रा. साखरखेड), नितीन सूर्यकांत जाधव (वय ३८) आणि विराज किशोर जाधव (वय १२, रा. गुहागर) यांचा समावेश आहे. उन्हाळी सुट्टी निमित्त हे सर्वजण आपल्या गावी आले होते. सोमवारी संध्याकाळच्या सुमारास धामणंद येथील नागझरी नदीच्या डोहात पोहण्यासाठी गेले असता पाण्याचा अंदाज न आल्याने ही दुर्दैवी दुर्घटना घडल्याची प्राथमिक माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.
स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, नदीतील पाण्याची खोली आणि प्रवाहाचा अंदाज न आल्याने तिघेही पाण्यात बुडाले. घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत तातडीने मदतकार्य सुरू केले. मोठ्या प्रयत्नांनंतर तिघांनाही बाहेर काढण्यात आले, मात्र त्यांचा मृत्यू झाला होता.
या घटनेनंतर धामणंद गावासह खेड तालुक्यावर शोककळा पसरली असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. अल्पवयीन मुलीसह तिघांचा मृत्यू झाल्याने नागरिकांमध्ये दुःख व्यक्त करण्यात येत आहे. मृतांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून नातेवाईकांचा आक्रोश पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले.
दरम्यान, या प्रकरणी खेड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. उन्हाळ्याच्या दिवसांत नदी, डोह आणि धरण परिसरात पोहण्यासाठी जाणाऱ्यांनी विशेष काळजी घेण्याचे आवाहन स्थानिक प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
स्थानिक नागरिकांनी नागझरी नदी परिसरात सुरक्षेच्या दृष्टीने सूचना फलक, संरक्षक उपाययोजना आणि धोकादायक ठिकाणी प्रतिबंधात्मक व्यवस्था करण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे.

