(रत्नागिरी / प्रतिनिधी)
रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे यांनी गुरुवारी संगमेश्वर तालुक्यातील फुणगुस प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट देऊन आरोग्य सेवांचा सविस्तर आढावा घेतला. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम व तत्पर राहावी, यासाठी आवश्यक औषधसाठा, मनुष्यबळ आणि आपत्कालीन प्रतिसाद व्यवस्था सदैव सज्ज ठेवण्याच्या सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
भेटीदरम्यान प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कार्यक्षेत्राची माहिती घेत बाह्यरुग्ण (ओपीडी) आणि आंतररुग्ण (आयपीडी) विभागातील सेवा, उपलब्ध औषधसाठा तसेच जिल्ह्यात सुरू असलेल्या एचपीव्ही (HPV) लसीकरण मोहिमेचा आढावा घेण्यात आला. याशिवाय प्रधानमंत्री जन आरोग्य योजना (PM-JAY) अंतर्गत सुरू असलेल्या कामकाजाचीही त्यांनी माहिती घेत अंमलबजावणीचा आढावा घेतला. यावेळी आरोग्य केंद्र परिसरात सुरू असलेल्या बांधकामाची प्रत्यक्ष पाहणी करून कामाच्या गुणवत्तेसह वेळेत पूर्णत्वासाठी आवश्यक सूचना देण्यात आल्या. संभाव्य आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना अखंड आरोग्य सेवा मिळाव्यात, यासाठी आवश्यक नियोजन करण्यावर त्यांनी विशेष भर दिला.
भेटीदरम्यान डॉ. लिंगायत, डॉ. आगरे तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रातील अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. केंद्रातील रुग्णसेवा, दैनंदिन कामकाज आणि विविध राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांच्या प्रभावी अंमलबजावणीबाबत समाधान व्यक्त करत, गुणवत्तापूर्ण आणि लोकाभिमुख आरोग्य सेवा सातत्याने उपलब्ध करून देण्यासाठी अधिक प्रयत्नशील राहण्याचे निर्देश मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे यांनी दिले.

