(देवरूख / वार्ताहर)
कोसुंब-ताम्हाने मार्गावर चिरे वाहतूक करणाऱ्या भरधाव ट्रकने मोटारसायकलला धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात आंबवली येथील प्रतीक प्रमोद सावंत (वय ३२) या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. आज बुधवारी दुपारी सुमारे १.३० वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला.
प्राथमिक माहितीनुसार, चिरे भरून भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रकची प्रतीक सावंत यांच्या मोटारसायकलला धडक बसली. या धडकेत ते गंभीर जखमी झाले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.
कोसुंब-ताम्हाने मार्गावर चिरे वाहतूक करणाऱ्या ट्रकची नियमित वर्दळ असते. या मार्गावर अनेकदा ट्रक भरधाव वेगाने धावत असल्याने वाहनचालकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. संबंधित ट्रकचा फिटनेस, आवश्यक कागदपत्रे तसेच वाहनांच्या वेगाबाबत प्रशासनाने कठोर तपासणी करावी, अशी मागणी परिसरातून होत आहे.
चिरे वाहतूक करणाऱ्या अवजड वाहनांवर नियंत्रण नसल्याने त्यांचा वेग वाढत असल्याचा आरोप स्थानिकांकडून करण्यात येत आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक सुरक्षित करण्यासाठी संबंधित प्रशासनाने तातडीने कारवाई करून वेगाने धावणाऱ्या ट्रकवर कठोर नियंत्रण आणावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

