(रत्नागिरी / प्रतिनिधी)
शहरालगतच्या मिरजोळे परिसरात घरफोडीची धक्कादायक घटना उघडकीस आली असून, चोरट्यांनी बंद घराला लक्ष्य करत तब्बल ४ लाख ८ हजार रुपयांच्या ऐवजावर हात साफ केला. सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा मुद्देमाल लंपास करण्यात आल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिरजोळे येथील लक्ष्मीकांतवाडी परिसरातील रहिवासी ओंकार पाडावे यांच्या घरात शनिवारी (१६ मे) रात्री अज्ञात चोरट्यांनी प्रवेश केला. घर बंद असल्याची संधी साधत चोरट्यांनी मुख्य दरवाजासह बेडरूमचा दरवाजाही अर्धवट तोडून घरात प्रवेश केला. त्यानंतर कपाटातील सोन्याचे दागिने तसेच सुमारे ५० हजार रुपयांची रोकड असा एकूण ४ लाख ८ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला.
रविवारी (१७ मे) सकाळी हा प्रकार उघडकीस आल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. याप्रकरणी ओंकार पाडावे यांनी रत्नागिरी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. दरम्यान, शहरालगतच्या भागात वाढत्या घरफोड्यांच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये अस्वस्थता पसरली असून, रात्रीच्या गस्तीत वाढ करण्याची मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे.

