(गणपतीपुळे / वैभव पवार)
रत्नागिरी तालुक्यातील मालगुंड येथील बळीराम परकर विद्यालयातील इयत्ता नववीतील विद्यार्थी कुमार अथर्व अनंत आग्रे याची राज्यस्तरीय टेनिस क्रिकेट अजिंक्यपद स्पर्धेसाठी रत्नागिरी जिल्हा संघात निवड झाली आहे. २० ते २३ ऑगस्ट २०२६ या कालावधीत अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी येथे ही स्पर्धा होणार असून, या स्पर्धेत अथर्व रत्नागिरी जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहे.
टेनिस क्रिकेट असोसिएशन रत्नागिरीच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय निवड चाचणीत अथर्वने उत्कृष्ट कामगिरी केली होती. त्यानंतर जुलै महिन्यात रत्नागिरी येथील प्रमोद महाजन क्रीडा संकुलात झालेल्या निवड चाचणीतही त्याने आपल्या खेळातील कौशल्य, शिस्त आणि सातत्यपूर्ण कामगिरीने निवड समितीचे लक्ष वेधून घेतले. या कामगिरीच्या आधारे टेनिस क्रिकेट असोसिएशन महाराष्ट्र आणि टेनिस क्रिकेट असोसिएशन अहिल्यानगर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित १७ वर्षांखालील राज्यस्तरीय टेनिस क्रिकेट अजिंक्यपद स्पर्धेसाठी त्याची रत्नागिरी जिल्हा संघात निवड करण्यात आली.
अथर्व हा गुणवान आणि होतकरू क्रिकेटपटू असून, बालपणापासूनच त्याला कबड्डीसह क्रिकेटची विशेष आवड आहे. बळीराम परकर विद्यालयात शिक्षण घेत असतानाच त्याने विविध शालेय क्रिकेट स्पर्धांमध्ये चमकदार कामगिरी केली आहे. तसेच गावातील विविध क्रिकेट संघांकडून खेळताना त्याने आपल्या खेळाची सातत्याने छाप पाडली आहे. तो उजव्या हाताने फलंदाजी आणि उजव्या हाताने गोलंदाजी करतो. फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तिन्ही क्षेत्रांत प्रभावी कामगिरी करणारा अष्टपैलू खेळाडू म्हणून त्याची ओळख निर्माण झाली आहे.
अथर्वचे वडील अनंत श्रीपत आग्रे हे माजी उच्च श्रेणी मुख्याध्यापक असून ते सेवानिवृत्त झाले आहेत. त्यांनी मुलाच्या क्रीडा कारकिर्दीला सातत्याने प्रोत्साहन दिले आहे. आई-वडिलांचा पाठिंबा, शाळेतील शिक्षकांचे मार्गदर्शन आणि अथर्वची मेहनत यामुळे त्याने राज्यस्तरीय स्पर्धेपर्यंत मजल मारली आहे.
शाळेचे मुख्याध्यापक बिपिन परकर, क्रीडाशिक्षक तसेच अन्य शिक्षकांनी अथर्वला क्रिकेटमध्ये प्रगती करण्यासाठी विशेष मार्गदर्शन केले. पालकांच्या प्रोत्साहनासोबतच शाळेतील शिक्षकांच्या मार्गदर्शनामुळे अथर्वने टेनिस क्रिकेटमध्ये रत्नागिरी जिल्हा संघात स्थान मिळवत आपल्या आई-वडिलांसह मालगुंड गावाचे नाव उज्ज्वल केले आहे.
अथर्वच्या या निवडीबद्दल बळीराम परकर विद्यालयातील शिक्षण संस्था, मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, पालक तसेच मालगुंडमधील ग्रामस्थांकडून त्याचे अभिनंदन करण्यात येत असून, राज्यस्तरीय स्पर्धेसाठी त्याला यशस्वी कामगिरीच्या शुभेच्छा देण्यात येत आहेत.

