(रत्नागिरी)
शिक्षणासोबत व्यावसायिक शिक्षण ही काळाची गरज ओळखून लहानपणापासून विद्यार्थ्यांना व्यवसाय शिक्षणाचे ज्ञान होण्यासाठी प्राथमिक विद्यामंदिरात व्यावसायिक शिक्षण कार्यशाळेचे आयोजन मुख्याध्यापिका सौ. राजवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते.
सदर कार्यशाळेसाठी रत्नागिरी तालुक्यातील निवळी येथील श्री. निनाद जोशी आणि सौ. स्नेहा जोशी हे मार्गदर्शक म्हणून लाभले. त्यांनी विद्यार्थ्यांना अगरबत्ती कशी बनवतात याचे प्रत्यक्ष दाखवले. यासाठी त्यांनी व्हिडिओ क्लिपचा प्रभावीपणे वापर केला. अनेक विद्यार्थ्यांनी शंका विचारल्या. त्या शंकांचे निरसन श्री. आणि सौ. जोशी यांनी केले. विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांनी उद्योजक श्री. व सौ. जोशी भारावून गेले. त्यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करून सर्व विद्यार्थ्यांना अगरबत्तीचे मोफत वाटप केले.
शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. राजवाडे यांनी श्री. निनाद जोशी आणि सौ.स्नेहा जोशी यांचे शाल, श्रीफळ व पुष्प देऊन आभार मानले. सर्व विद्यार्थ्यांचे, शिक्षकांचे आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कौतुक केले.

