( रत्नागिरी / प्रतिनिधी )
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रथम त्यांच्या मध्ये सर्व प्रकारची मूल्य रुजवणे आवश्यक आहे. मूल्यांमुळे विद्यार्थी उत्तम प्रकारे आकलन करु लागतात आणि यातूनच ते अधिक चौकस – जिज्ञासू बनतात असे प्रतिपादन स. रा. देसाई अध्यापक विदयालयाचे अध्यापकाचार्य एस. आर. जोपले यांनी केले.
माध्यमिक, उच्च माध्यमिक, कला आणि क्रीडा शिक्षकांसाठी फाटक हायस्कुल रत्नागिरी येथे डाएट तर्फे आयोजित वरिष्ठ वेतन श्रेणी प्रशिक्षणामध्ये ‘ मूल्यशिक्षण ’ या विषयावर जोपले हे बोलत होते. मूल्य शिक्षण या विषयावरील एक तासाचे मार्गदर्शन शिक्षकांना प्रेरणा देणारे ठरले.
हसत खेळत, तणावमुक्त शिक्षण देणे ही काळाची गरज असल्यामुळे जोपले यांनी आपल्या पाठाची सुरुवात आनंददायी आणि मूल्यावर आधारीत विचारांनी केली. शिक्षणामध्ये मूल्ये का महत्वाची आहेत, हे सांगताना जोपले यांनी विविध अभ्यासपूर्ण उदाहरणं दिली. संपूर्ण पाठ हा चर्चात्मक पद्धतीने संपन्न झाल्यामुळे तो अधिक प्रभावी झाला. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मूल्यांच्या आधारे ज्ञानार्जन केल्यास ते अधिक प्रभावी आणि परिणामकारक ठरेल असे जोपले यांनी अखेरीस नमूद केले.