( सातारा )
सातारा जिल्हा कारागृहातून एक धक्कादायक घटना समोर आली असून, नियमित अंगझडतीदरम्यान एका कैद्याकडून गांजाच्या दोन पुड्या जप्त करण्यात आल्या आहेत. या प्रकारामुळे कारागृह प्रशासनात एकच खळबळ उडाली असून, प्रतिबंधित अंमली पदार्थ कारागृहात कसा पोहोचला, याबाबत तपास सुरू करण्यात आला आहे. गांजा सापडलेल्या कैद्याचे नाव संकेत अनंत तारू असे असून त्याचा बंदी क्रमांक ३०६ आहे. ही घटना सातारा जिल्हा कारागृहातील सर्कल क्रमांक ३ मधील बॅरेक क्रमांक १ आणि ३ मध्ये उघडकीस आली.
मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी पहाटे कारागृह पोलीस नियमित तपासणी आणि बंदींची अंगझडती घेत होते. यावेळी कैदी संकेत तारू याच्याकडे संशयास्पद हालचाली दिसून आल्याने अधिक तपास करण्यात आला. तपासादरम्यान त्याने अंडरवेअरमध्ये लपवून ठेवलेल्या गांजाच्या दोन पुड्या आढळून आल्या. त्यानंतर तातडीने त्या जप्त करण्यात आल्या. या प्रकरणी कारागृह कर्मचारी संदीप आनंदराव बोराटे (वय ४५, रा. जेल वसाहत, सातारा) यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी संकेत अनंत तारू याच्याविरोधात अमली पदार्थ प्रतिबंधक कायदा अर्थात NDPS Act 1985 अंतर्गत कलम ८(क) आणि २७ अन्वये गुन्हा नोंद केला आहे.
दरम्यान, कारागृहासारख्या उच्च सुरक्षा क्षेत्रात गांजा आढळल्याने सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. संबंधित गांजा कारागृहात नेमका कसा पोहोचला, याचा तपास सुरू असून, या प्रकरणाचा अधिक तपास हवालदार इंगवले करत आहेत.

